टक्केवारीमुळे विकासकामे रखडल्याने भाजपचा ठिय्या; ठाणे जिल्ह्यातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:26 AM2020-10-13T01:26:53+5:302020-10-13T01:28:33+5:30
प्रभागांतील कामे मंजूर करण्याची मागणी
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून गोषवारा सादर करण्यासाठी एक टक्का दिला जात नसल्याने विकासकामे रखडली असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. विकासकामे करण्याच्या मागणीसाठी भाजपने चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसी महापालिका मुख्यालयात प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर सोमवारी ठिय्या धरला.
भाजपच्या या आंदोलनात विरोधी पक्षनेते राहुल दामले, भाजप गटनेते शैलेश धात्रक, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक दया गायकवाड, संदीप गायकर, नितीन पाटील, राजन आभाळे, विश्वदीप पवार, अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका रेखा चौधरी, वैशाली पाटील, सुनीता पाटील, खुशबू चौधरी सहभागी झाले होते.
केडीएमसीतील नगरसवेकांची मुदत ११ नोव्हेंबरला संपत आहे. दुसरीकडे मनपाने अर्थसंकल्प मंजूर होऊनही त्याची पुस्तिका अद्याप तयार केलेली नाही. त्यामुळे नगरसेवकांची कामे रखडली आहेत. ही कामे मंजूर करावीत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
मनपा हद्दीतील नागरिकांसाठी अभय योजना जाहीर करण्यासंदर्भात सोमवारी दुपारी प्रशासकीय भवनात महापौरांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या त्यांच्या दालनाच्या दिशेने जात असताना त्यांनी ठिय्या देणाऱ्या नगरसेवकांची विचारपूसही केली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, चव्हाण यांनी टक्केवारीच्या केलेल्या आरोपाविषयी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, आमदारांसोबत झालेल्या बैठकीत टक्केवारीचा विषय मांडण्यात आला नव्हता. तरीही त्यांनी केलेल्या आरोपाविषयी एखाद्या तरी प्रकरणात पुरावा सादर केल्यास त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल.
‘निविदांमध्ये बड्या नेत्याचा हात’
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध विकास प्रकल्प दीर्घकाळ रखडलेले आहेत. या प्रकल्पांच्या निविदांमध्ये ठाणे जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा हात आहे. त्यामुळेच हे प्रकल्प रखडले असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला आहे. मात्र, हे आरोप करताना त्यांनी कोणाचे थेट नाव घेतले नाही.