कल्याण - मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी कल्याणच्या इतिहासात नवी नोंद होणार आहे. कल्याण शहरात प्रथमच पाच हजारांहून अधिक विद्यार्थी कल्याणच्या काळा तलावाच्या दुतर्फा आपल्या कुंचल्यातून रंग भरणार आहेत. निमित्त आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन व भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांची स्मृतिशताब्दी. कल्याण डोंबिवली महापालिका व राम गणेश गडकरी कट्टा यांच्यातर्फे मंगळवारी २३ तारखेला `महापौर बाल चित्रकला' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कल्याण परिसरातील विविध शाळांतील पाच हजारांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे चार हजार विद्यार्थ्यांची पूर्वनोंदणी झाली आहे. मंगळवारी प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थी संख्या पाच हजाराहुन अधिक होणार आहे. या बाल चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ८ वाजता महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते होणार आहे. स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेनंतर सर्व विद्यार्थी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत.या स्पर्धेचा बक्षिस समारंभ सायंकाळी ७ वाजता काळा तलाव येथेच होणार आहे. विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे बक्षिसे दिली जाणार आहेत शिवाय विविध औद्योगिक संस्थांतर्फे बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. सायंकाळी काळा तलाव येथे राम गणेश गडकरी कट्ट्याचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते होणार आहे. शिवाय सारेगमप मध्ये प्रथम आलेला नचिकेत लेले याचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका व राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे करण्यात आले आहे.
मंगळवारी रंगांनी न्हाऊन निघणार काळा तलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 3:24 PM