हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : रिअल क्राफ्ट प्रणालीअंतर्गत मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या परंतु प्रत्यक्षात मासेमारी परवाना न घेतलेल्या नौकांची नोंदणीच रद्द करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचा नव्याने कारभार स्वीकारणाऱ्या आयुक्त अतुल पाटणे यांनी काढले आहेत. यामुळे एका नोंदणीवर अनेक बेकायदेशीर नौका (ट्रॉलर्स) चालविणाºया ट्रॉलर्सधारकांना चाप बसणार असून राष्ट्रीय सुरक्षा भंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.कोकणातील मुंबई, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील किनाºयावर मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. समुद्रात पर्ससीन आणि एलईडी पद्धतीने बेकायदेशीरपणे मासेमारी करणाºया ट्रॉलर्समुळे मत्स्य उत्पादनाची आकडेवारी घसरली असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बेकायदा चालणाºया ट्रॉलर्सविरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही मत्स्यव्यवसाय विभागातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा छुपा वरदहस्त असल्याने मागील अनेक वर्षांपासून हा बेकायदा छुपा खेळ अव्याहतपणे सुरूच होता. राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांनी २० आॅगस्ट रोजी कारवाईचा आदेश काढून बेकायदा सुरू असलेल्या ट्रॉलर्सविरोधात रणशिंग फुंकले असून ‘रिअल क्राफ्ट’ प्रणाली अंतर्गत मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या परंतु प्रत्यक्षात मासेमारी परवाना न घेतलेल्या नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्तांना कारवाईचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या कार्यालयाकडून प्रत्येक बंदरातील नौकांची माहिती घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार मत्स्य विभागांतर्गत मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या नोंदणीकृत नौकांची संख्या २८ हजार ७६८ इतकी असून त्यापैकी १५ हजार ६१२ नौकांनी मासेमारी परवाना घेतला आहे. तर उर्वरित १३ हजार १५६ नौकांनी मासेमारी परवाना अजूनही घेतलेला नसल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे डिझेल मंजूर झालेल्या नौकांची संख्या ११ हजार असल्याने नोंदणी आणि प्रत्यक्षात मासेमारी करणाºया नौकांच्या संख्येत मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या नौकांनी मासेमारी परवाना घेतला नसेल, अशा सर्व नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश आयुक्त पाटणे यांनी दिले आहेत.पालघर-ठाण्यात लवकरच कारवाईला सुरुवातसहायक आयुक्त पालघर विभागांतर्गत दोन हजार २३२ मासेमारी नौकांची नोंद करण्यात आली आहे, तर एक हजार ९२८ नौकांचा परवाना घेतलेला आहे. त्यामुळे उर्वरित मासेमारी परवाना न घेतलेल्या ३०४ नौकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल होण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी सांगितले.बेकायदेशीर नोंदणी प्रक्रिया करणारे येणार अडचणीतबहुतांशी पर्ससीन नौका या लाकूडबांधणीच्या होत्या, परंतु आताच्या पर्ससीन नौका फायबरमध्ये असल्याचे दिसून येत आहेत. लाकडाच्या नौकांचे नोंदणी नंबर फायबर नौकांना देण्यात आले असून अशा ४९५ बेकायदेशीर नौका मत्स्यव्यवसाय विभागाला आढळून आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिली. अशी बेकायदेशीर प्रक्रिया करणारे परवाना अधिकारी गोत्यात येणार असून आपण याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले.वरिष्ठांच्या आदेशान्वये नोंदणी झालेल्या परंतु प्रत्यक्षात मासेमारी परवाना न घेतलेल्या नौकांची नोंदणी रद्द करण्याच्या दृष्टीने आमचे काम सुरू आहे. लवकरच कारवाईला सुरुवात करणार आहोत.- अजिंक्य पाटील, सहायक आयुक्त, पालघर-ठाणे
मासेमारी परवाना न घेतलेल्या नौकांची नोंदणी होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:56 AM