पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवामध्ये सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 09:02 PM2017-09-11T21:02:44+5:302017-09-11T21:02:47+5:30
ठाणे, दि. 11 - 29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवा येथे समुद्रामध्ये सापडला. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाची डिएनए तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
पावसामध्ये अडकलेली शेजारी महिला आणि मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात रामनगरातील अजय आठवाल 29 ऑगस्ट रोजी नाल्यामध्ये वाहून गेला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणोने बराच शोध घेऊनही उपयोग झाला नव्हता. शोध मोहीम तीव्र करण्यासाठी मध्यंतरी भारिप-बहुजन महासंघाने आंदोलनही केले होते. ठाण्यापासून जवळपास 50 किलोमिटर अंतरावर असलेल्या न्हावाशेवा येथील समुद्रामध्ये अजयचा मृतदेह पोलिसांना शनिवारी सापडला. 14 दिवसानंतर सापडलेला हा मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र मृतदेह सापडलेले ठिकाण, त्याचे वय यावरून मृतदेह अजयचाच असावा असा अंदाज आल्याने न्हावाशेवा पोलिसांनी श्रीनगर पोलिसांमार्फत त्याच्या पत्नीला ही माहिती दिली. अजयची पत्नी आणि आईने मृतदेहाची ओळख पटविली आहे. परंतु खात्रीसाठी मृतदेहाचा आणि अजयच्या आईचा डिएनए तपासणीसाठी पाठविला जाणार असून, त्यानंतरच मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.