बॉम्ब शोधक पथक व श्वानच्या मदतीने तपासणी; उल्हासनगर बॉम्बच्या अफवेने हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 09:59 AM2021-10-14T09:59:15+5:302021-10-14T09:59:42+5:30
उल्हासनगरातील जपानी व गजानन कपडे मार्केटसह जीन्स, गाऊन, इलेक्ट्रॉनिक, फर्निचर आदी मार्केट प्रसिद्ध असून दसरा-दिवाळी सणा निमित्त साहित्य खरेदी करण्यासाठी शेकडो नागरिकांनी मार्केट मध्ये गर्दी केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील गोलमैदान, हिरा मॅरेज हॉल परिसर बॉम्ब असल्याचा मेल संध्याकाळी पोलीस उपायुक्त कार्यालयाला आल्याने, पोलिसांची एकच धावपळ उडाली. बॉम्ब शोधक पथक व श्वानच्या मदतीने परिसराची तपासणी रात्री उशिरा पर्यंत केली असून काहीच निष्पन्न झाले नाही. बॉम्बची अफवा असल्याची बोलले जात असलेतरी प्रकारचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
उल्हासनगरातील जपानी व गजानन कपडे मार्केटसह जीन्स, गाऊन, इलेक्ट्रॉनिक, फर्निचर आदी मार्केट प्रसिद्ध असून दसरा-दिवाळी सणा निमित्त साहित्य खरेदी करण्यासाठी शेकडो नागरिकांनी मार्केट मध्ये गर्दी केली. शहरातील मार्केट गर्दीने फुलले असतांना बुधवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त कार्यालयात एक मेल येऊन गोलमैदान व एका मॅरेज हॉल परिसरात बॉम्ब ठेवल्याचे त्यामध्ये म्हटले. या मेलने पोलिसांची झोप उडाली. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी बॉम्ब शोधक व श्वान पथकाला तपासणी करण्यासाठी बोलाविले. बुधवारी रात्री उशिरा पर्यंत गोलमैदान परिसरसह एका मॅरेज हॉल परिसरात तपासणी सुरू होती. तपासणी पूर्वी परिसरात कडक पोलीस बंदोबस ठेवून नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्यास आला होता. मात्र तपासणीत काहीच आढळले नसल्याने, बॉम्बची अफवा असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी गोलमैदान व हिरा मॅरेज हॉल परिसरात पोलीस बंदोबस्त कायम ठेवला असून सायबर क्राईम विभागाद्वारे निनावी मेलचा शोध घेण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. तसेच नागरिकांनी कोणत्याही बेवारस व संशयास्पद वस्तूला हात न लावता, त्याबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले. बुधवारी रात्री पासून बॉम्बच्या अफवेने शहर हादरले असून याप्रकाराचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त मोहिते म्हणाले. बुधवारी रात्री गोलमैदान परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होते.