ठाणे परिवहनचे ४५८.१३ कोटींचे बजेट, अंदाजपत्रकात केला 350 बसेस घेण्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 08:58 AM2021-01-23T08:58:10+5:302021-01-23T09:00:50+5:30
ठाणे : ठाणे परिवहन सेवेने यंदाच्या अंदाजपत्रकात ठाणेकरांच्या सेवेत ३५० नव्या बसेस दाखल करण्याचा दावा केला आहे; परंतु उत्पन्नवाढीसाठी ...
ठाणे :ठाणे परिवहन सेवेने यंदाच्या अंदाजपत्रकात ठाणेकरांच्या सेवेत ३५० नव्या बसेस दाखल करण्याचा दावा केला आहे; परंतु उत्पन्नवाढीसाठी जुन्याच योजनांच्या कुबड्या घेतल्या आहेत. अशा प्रकारे १४४ कोटी ८४ लाख रुपये तुटीचे ठाणे परिवहन सेवेचे २०२१-२२ चे ४५८ कोटी १३ लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक परिवहन प्रशासनाने परिवहन समितीपुढे शुक्रवारी सादर केले. दुसरीकडे परिवहनने महापालिकेकडून पुन्हा २८४.६३ कोटींच्या अनुदानाची मागणी केली आहे. त्यामुळे पालिकेच्या अनुदानावरच यंदाही परिवहनला अवलंबून राहावे लागणार आहे.
टीएमटीच्या मूळ अंदाजपत्रकात विविध उत्पन्नाचा समावेश केला आहे. त्यामध्ये साध्या ९४ बसेस भाड्यापोटी २२ कोटी ९९ लाख इतके उत्पन्न, जेएनयूआरएम -२ अंतर्गत आलेल्या १९० बसेसपासून ५७ कोटी २६ लाख, वातानुकूलीत वोल्वो ३० बसेसपासूनचे उत्पन्न १६ कोटी ५६ लाख, महिलांसाठी ५० तेजस्विनी बसेसपासून ९ कोटी ४६ लाख असे एकूण १०६ कोटी २७ लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे. परिवहन उपक्रमांत नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या ५० मिडी बसेसपासून ४ कोटी ५९ लाख, १०० इलेक्ट्रीक बसेसपासून ४ कोटी ५३ लाख, २०० मिडी बसेसपासून ९ कोटी ७ लाख असे परिवहन सेवेचे नवीन बसेससहीत एकूण १२४ कोटी ४६ लाख इतके प्रवासी उत्पन्न अपेक्षित धरले आहे. त्यानुसार परिवहनच्या ताफ्यात नव्याने ३५० बसेसचा ताफा सहभागी होणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून २००, पीपीपी तत्त्वावर एमएमआरडीएकडून १०० इलेक्ट्रीक बसेस व ठाणे महापालिकेकडून ५० मिडी बसेस अशा स्वरूपात या बसेस घेतल्या जाणार आहेत. तिकीट विक्री उत्पन्नाव्यतिरिक्त इतर मिळकतीपासून, म्हणजे बसेसवरील जाहिरात भाड्यापोटी यावर्षी ४ कोटी ३४ लाख, विद्यार्थी पासेसपोटी १ कोटी २५ लाख, निरुपयोगी वाहन वस्तू विक्रीपोटी ५ कोटी २० लाख, सवलतीपोटी अनुदान (दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक) करिता १८ कोटी ७९ लाख, पोलीस खात्याकडून प्रतिपूर्तीपोटी २०१८-१९ पासून प्रलंबित १७ कोटी २२ लाख, तसेच इतर किरकोळ उत्पन्न २ कोटी २२ लाख असे एकित्रत ४९ कोटी २ लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे. या अंदाजपत्रकात एकूण महसुली जमा १७३ कोटी ४८ लाख इतकी अपेक्षित धरण्यात आली आहे.
दुसरीकडे वाहन दुरुस्तीसाठी १३ कोटी ८४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विविध विभागाकडील प्रलंबित दाव्यांसाठी ४ कोटी ८६ लाख, यंदा १५७ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानुसार २१ कोटी ६ लाखांची तरतूद सेवानिवृत्ती निधीसाठी करण्यात आली आहे. यापैकी १८ कोटी रुपयांच्या महसुली अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. शिवाय थकीत उपदान व रजा वेतनसाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही रक्कमही महापालिकेकडून अनुदान स्वरूपात मागण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आक्षेप -
ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. मुळात मुंबई महापालिका अधिनियमानुसार ठाणे परिवहन सेवेत लेखा परीक्षकांचं पद भरण्यात आलेलं नाही. ही जागा कित्येक वर्ष रिक्त आहे. परिणामी, हा अर्थसंकल्प मुळात तयार कोणी केला, असा प्रश्न निर्माण होतो, असा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीचे परिवहन सदस्य प्रकाश पाटील, नितीन पाटील, मोहसीन शेख आदी सदस्यांनी या अर्थसंकल्पाला विरोध दर्शवला आहे.
उत्पन्नवाढीसाठी घेतल्या जुन्याच योजनांच्या कुबड्या -
अगोदरच डबघाईस आलेल्या ठाणे परिवहन सेवेने शुक्रवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकात ३५० नव्या बसेस घेण्याचा दावा केला असला तरी, उत्पन्नवाढीसाठी जुन्याच योजनांच्या कुबड्यांचा आधार घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या योजनांमधून नेमके किती उत्पन्न मिळणार, याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.
परिवहन सेवेच्या जागांवर होर्डिंग्जला परवानगी देणे, परिवहन सेवेच्या चौक्या जाहिरातींचे अधिकार देऊन विकसित करणे, अत्याधुनिक पद्धतीचे निवारे विकसित करणे, परिवहन सेवेच्या बस आगारांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविणे, परिवहन सेवेच्या जागांमध्ये एटीएम सेंटरची उभारणी करून उत्पन्नाचे स्रोत विकसित करणे, बसमध्ये एलईडी स्क्रीन लावून जाहिरातीद्वारे उत्पन्न मिळविणे, बसफेऱ्या वाढविण्याबाबत उपाययोजना आणि आनंदनगर व कोलशेत आगारातील राखीव भूखंड ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित करणे आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
ठाणे शहरामध्ये येणारा प्रवासी हा मुख्यत्वे रेल्वे स्टेशन येथे येऊन येथून इच्छीत स्थळी प्रवास करीत असतो. ठाणे सॅटीस येथून १०२ मार्गांवर प्रवासी सेवा पुरविली जाते. सॅटीस येथे आलेल्या प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता मेगाफोनद्वारे बसेसबाबतची माहिती देण्यात येते. सॅटीस येथे प्रवाशांचा ओघ मोठ्या प्रमाणात असून, प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गर्दीच्या वेळेत पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते.
ठाणे शहर अंतर्गत परिवहन सेवेचे विविध बसथांबे आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या बस थांब्यांवर डिजिटल बस थांबे निर्माण करून या थांब्यांवर बस आगमनाची वेळ दर्शविण्यात येणार आहे. परिणामी, परिवहन सेवेच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस आगमनाची निश्चित वेळ समजण्यास मदत होऊन त्यायोगे प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय व ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेशी समन्वय साधून शहरामध्ये अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांना आळा घालण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असून, त्यायोगे ठाणे परिवहन सेवेच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याचे नियोजन आहे. ठाणे परिवहन सेवेच्या बस ताफ्यामध्ये जास्तीतजास्त मिडी - मिनी बसेस घेऊन ज्या मार्गांवर बस सेवा उपलब्ध नाही, असे मार्ग सेवा कक्षात आणून जास्तीतजास्त प्रवासी परिवहन सेवेकडे आकर्षित करण्याचे नियोजन आहे.
ठाणेकर जनतेने खाजगी वाहनांऐवजी, परिवहन उपक्रमाच्या बसेसचा वापर करण्याबाबत डिजिटल माध्यमातून जनतेला आवाहन करता येईल, अशा प्रकारचे नियोजन करण्यात येणार आहे. परिवहन सेवेने सादर केलेल्या अंदाजपत्रकात १४४ कोटी ८४ लाखांची तूट दर्शविण्यात आली आहे. ती तूट भरून काढण्यासाठी अनुदान स्वरूपात मागणी करण्यात आली आहे.
२८४ कोटींच्या अनुदानाची मागणी
ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या अंदाजपत्रकात यंदा २८४.६३ लाखांच्या अनुदानाची मागणी महापालिकेकडून केली आहे. मागील वर्षी परिवहनने २९१ कोटींची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्षात परिवहनला १३० कोटी मिळाले होते. त्यामुळे यंदा परिवहनने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७ कोटी कमी करून २८४.६३ कोटींची मागणी केली आहे.