ठाणे : खंडणीसाठी ठाण्यातील एका बिल्डरचा खून करण्याची तयारी पुजारी टोळीच्या दोन हस्तकांनी केली होती. एका गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या या आरोपींनी तशी कबुली दिल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी ठाणे न्यायालयाला दिली.ठाण्यातील एका बिल्डरकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसºया दिवशी, ६ आॅक्टोबर रोजी मालाड येथील नितीन गोपाळ राय (वय ४२) आणि घाटकोपर येथील दिनेश नारायण राय (वय ५२) या दोघांना पोलिसांनी संशयावरून अटक केली होती. त्यांच्याजवळून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली होती. दोन्ही आरोपी ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा गुन्हा आणि बिल्डरच्या खंडणीच्या गुन्ह्याचा आपसातील संबंध आतापर्यंत स्पष्ट झाला नव्हता. खंडणीविरोधी पथकाने चौकशी केली असता, आरोपींनी आपण बिल्डरचा खून करण्यासाठीच ठाण्यात आलो होतो, अशी कबुली त्यांनी दिली. मंगळवारी न्यायालयासमोर ही परिस्थिती मांडली असता, त्यांची पोलीस कोठडी ४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली.तक्रारदार बिल्डरला पुजारीच्या माध्यमातून खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.आरोपींवर पूर्वीचे दोन गुन्हेखंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या मालाड येथील नितीन गोपाळ राय आणि घाटकोपर येथील दिनेश नारायण राय यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई येथे त्यांच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून, त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
खंडणीसाठी बिल्डरच्या खुनाची तयारी; पुजारी टोळीच्या हस्तकांची कबुली, पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:53 PM