- नारायण जाधव ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची भूसंपादनासह कोरोनामुळे रखडपट्टी सुरू असतानाच आता (एनएचएसआरसीएल) नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने देशात सात मार्गांवर नव्या बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्यांचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नुकत्याच निविदा मागविल्या आहेत. यातील दोन मार्ग हे मुंबईवरून धावणार आहेत. यात ७११ किमीच्या मुंबई-हैदराबाद आणि ७४१ किमीच्या मुंबई-नाशिक-नागपूर मार्गाचा समावेश असल्याचे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी सांगितले.
मुंबई-नाशिक-नागपूर हा मार्ग सध्या ७४१ किमीचा प्रस्तावित असून, त्याचे अंतर कमी-जास्त होऊ शकते. सध्या त्याचा सविस्तर प्रकल्प तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया मंगळवारी कॉर्पोरेशनने सुरू केली आहे. या डीपीआरमध्ये मुंबई-नाशिक-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या प्रस्तावित मार्गाचे सर्वेक्षण, मार्गादरम्यान असलेल्या ओव्हरहेड, अंडरग्राउंड युटिलिटीज् आणि प्रस्तावित मार्गावर वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी योग्य जागांच्या पर्यायांची चाचपणी करण्यात येणार आहे. याशिवाय मार्गात किती जमीन लागणार, वनजमीन किती असणार, किती लोक बाधित होणार, त्यासाठी अंदाजे किती खर्च येणार हे पाहिले जाणार आहे.
समृद्धी महामार्गास समांतर हवी बुलेट ट्रेन
च्सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बुलेट ट्रेन मुंबई-नाशिक-नागपूर समृद्धी महामार्गास समांतर असावी, अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. समृद्धीसाठी राज्य सरकारने आधीच जमीन संपादित केली असून, भूसंपादनाचा मोठा अडथळा दूर होऊन एनएचएसआरसीएलची मोठी डोकेदुखी दूर होणार आहे.
च्मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन प्रस्तावित केल्यानंतर मोदी सरकारवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका करून देशातील इतर मार्गांवरही बुलेट ट्रेन सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने नव्या सात मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला.