कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बीएसयूपी प्रकल्पातील इंदिरानगर संक्रमण शिबिरात वास्तव्य करणाऱ्या १०० जणांच्या थकलेल्या विजेच्या बिलापोटी १५ लाख रुपये बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना भरण्यास सांगितले जात आहे. या रहिवाशांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांची भेट घेतली. महापालिका प्रशासनामुळे हा घोळ झाला असून त्याचा फटका लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
महापालिका हद्दीत पूरपरिस्थिती उद्भवल्यास पुरेशी संक्रमण शिबिरे नाहीत. महापालिकेकडे बीएसयूपी योजनेंतर्गत घरे बांधून तयार आहेत. मात्र, त्यांचे लाभार्थ्यांना वाटप केले जात नाही. इंदिरानगरातील घरे संक्रमण शिबिराकरिता महापालिकेने दिली आहेत. त्याठिकाणी १०० व्यक्तींनी आसरा घेतला. त्यांचे विजेचे बिल मूळ रक्कम आणि व्याजासह १५ लाख रुपये आले आहे. ही रक्कम कुणी भरायची असा वाद निर्माण झाला. १०० संक्रमण शिबीरार्थी हे निघून गेल्यानंतर त्याठिकाणी १८ लाभार्थ्यांना घरे देण्यात आली. मात्र आता ते थकलेले १५ लाखांचे बिल हे लाभार्थ्यांनी भरावे, असे सांगितले जात आहे. याबाबत दीपक थोरात यांनी आवाज उठविला. ज्यांना बिल भरण्याची सक्ती केली जात आहे त्यामध्ये नियाज शेख, सुभाष यादव, सुरेश रोकडे, राजू पटेल, रशीद शेख, कादिर खान, लक्ष्मण वाघमारे, लक्ष्मण शिंदे, शमिता खान आदी १८ जणांचा समावेश आहे. संक्रमण शिबिरार्थींच्या विजेचे बिल बीएसयूपी लाभार्थ्यांनी का भरायचे, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला. काही लाभार्थ्यांना अद्याप भाडे दिलेले नाही. लाभार्थी, केडीएमसी आणि कंत्राटदार यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. काही लाभार्थ्यांना अपुरे घरभाडे दिले आहे, असा थोरात यांचा आरोप आहे.
व्याजामुळे थकबाकी फुगली
लाभार्थ्यांनी राष्ट्रवादीचे जगन्नाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली. शिंदे यांनी सांगितले की, महापालिकेचा अजब कारभार यातून उघड झाला आहे. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यासंदर्भात महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांच्या काळातील हे प्रकरण आहे. त्यावेळी शिबिरार्थीना दिलेल्या वीज पुरवठय़ाचे १० लाख बिल आले होते. त्यावरील व्याज वाढून ही रक्कम आता १५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. बीएसयूपी प्रकल्प अधिकारी आणि प्रभाग अधिकारी यांनी बिल थकल्याचे मान्य केले.
---------------------------------------