ठाणे - जेएनएनयुआरएमच्या २०० बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होत असतांनाच आता ठाणेकरांना साध्या बसच्या तिकीटातच गारेगार प्रवास करण्याची संधी महापालिका उपलब्ध करुन देणार आहे. त्यानुसार इथेनॉईलवर धावणाऱ्या दोन बस डिसेंबर अखेर ताफ्यात दाखल होणार आहेत. तर पहिल्या टप्यात पाच इलेक्ट्रीक बस देखील जानेवारीत म्हणजेच नव्या वर्षात ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे.ठाणे परिवहनच्या सेवेचा विस्कटलेल्या गाड्यामुळे ठाणेकरांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे यावर मात करण्यासाठी आणि ठाणेकरांना उत्तम सेवा देण्यासाठी ठाणे महापालिका १०० इलेक्ट्रीक हायब्रीड बसेस घेणार आहे. पीपीपी तत्वावर या बस रस्त्यावर धावणार असल्या तरी पालिकेला कोणताही खर्च न करता, उलट पालिकेला महिनाकाठी १०० बस पोटी १० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. आता या बसेससाठी आवश्यक असणारे चार्चींग स्टेशन आनंद नगर जकात नाक्यावर उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यानुसार नव्या वर्षात पहिल्या टप्यात पाच बसेस सेवेत दाखल होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. या बसेस आनंद नगर ते घोडबंदर गायमुख या मार्गावर धावणार आहेत. यामध्ये एका कंपनीने युरोपच्या धर्तीवर ज्या पध्दतीने इलेक्ट्रीक बस या धावत आहेत, त्यानुसारच ठाण्यातही त्याच पध्दतीचा अवलंब करुन ही सेवा दिली जाणार आहे. या बसमध्ये मागील बाजूस संबधींत एजेन्सी वायफाय स्टेशन अथवा लॅपटॉप आणि प्रिंटर अथवा इतर काहीही उपलब्ध करु देऊ शकणार आहे.दरम्यान पर्यावरण पुरक पध्दतीच्या इथेनॉईलच्या ५० बसेस घेण्याचा पालिकेचा मानस असून त्यानुसार पहिल्या टप्यात डिसेंबर अखेर २ त्यानंतर जानेवारीत पाच आणि मार्च पर्यंत उर्वरीत बसेस सेवेत दाखल होणार आहेत. या बसेस घोडबंदर ते ठाणे आणि मुलुंड या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. सध्या परिवहनच्या एसी बसेसचे तिकीट दर हे घोडबंदर पर्यंत ३५ रुपये आहे. तर साध्या बसेसचे दर हे २१ रुपये एवढे आहे. शिवाय खाजगी बसेसचे १५ रुपये आणि शेअर रिक्षाचे देखील २५ ते ३० रुपये आकारले जातात. परंतु इथेनॉईल बसचे तिकीट हे केवळ २५ रुपये असणार आहे. बसेसमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय, मोबाइल चार्जींग, एलईडी आदींची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस पालिकेचा आहे. याच एलईडीवर जाहीराती करुन पालिका त्यातून उत्पन्न घेणार आहे.
ठाणेकरांचा साध्या तिकीटातच होणार प्रवास गारेगार, इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर धावणाऱ्या बसेस नव्या वर्षात सेवेत होणार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:35 PM
ठाणेकरांचा प्रवास नव्या वर्षात आरामदायी असाच होणार आहे. परिवहनच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर चालणाऱ्या बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. साध्या दरात एसची प्रवास ठाणेकरांना मिळणार आहे.
ठळक मुद्देजानेवारीत पहिल्या टप्यात पाच इलेक्ट्रीक बसेस रस्त्यावर धावणारडिसेंबर अखेर दोन इथेनॉईलच्या बसेस सेवेत होणार दाखल