कल्याण-ठाणे वाहतूक कोंडीवर तातडीने बैठक बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:11+5:302021-09-25T04:44:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : काही दिवसांपासून ठाणे ते कल्याण मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : काही दिवसांपासून ठाणे ते कल्याण मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधितांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शुक्रवारी पत्राद्वारे केली.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ठाणे ते कल्याण फाट्यापर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. ठाणे ते कल्याण या अर्ध्या तासाच्या प्रवासाला तीन ते चार तास लागत आहेत. ठाणे जिल्हा तसेच मुंबई व उपनगरांना नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वपूर्ण महामार्ग आहे. मात्र, या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातच अवजड वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी होत असलेल्या कोंडीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच अजूनही सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू झाला नसल्याने शेकडो खासगी आस्थापनांचे कर्मचारी खासगी व सार्वजनिक वाहनाने मुंबईला या मार्गानेच प्रवास करतात.
या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे बुधवारी उच्च शिक्षणाच्या सामायिक परीक्षेसाठी कल्याणमधील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विलंब झाल्याने परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी, आरटीओ अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक बोलवावी आणि कोंडी, खड्ड्यांची व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री शिंदे तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.
------------