लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सात कोटी रुपयांच्या घाेटाळ्याप्रकरणी ठाण्यात आयएएस अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ४७० प्रवासी बसथांब्यांच्या जागी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर प्रवासी निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याच्या ठेका देण्यात आला होता.
यात सहा कोटी ७३ लाख ५५ हजार ९४६ रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी तत्कालीन परिवहन व्यवस्थापक व विद्यमान सनदी अधिकारी अशोक करंजकर यांच्यासह १० जणांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगार व्यवस्थापक दिलीप कानडे, निवृत्त परिवहन व्यवस्थापक श्रीकांत सरमोकदम, निवृत्त परिवहन उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित, तत्कालीन मुख्य लेखापाल अजित निऱ्हाळे (निवृत्त), परिवहनमधून बडतर्फ झालेले तत्कालीन वाहतूक अधीक्षक गुरुकुमार पेडणेकर, तत्कालीन लेखापरीक्षक (निवृत्त) पिटर पिंटो आणि सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत धुमाळ आदी आठ अधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सनदी अधिकारी असलेले करंजकर हे सध्या कृषी उद्योग महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर सोल्युशन्स अॅडव्हर्टायझिंगचे प्रवीण सोलंकी आणि गुज्जू अॅड्सचे व्यवस्थापकीय संचालक भावेश भिडे या दोन खासगी व्यक्तींचाही यात समावेश आहे.
करंजकर यांच्यासह आठ अधिकाऱ्यांनी २००८ ते २०१८ या काळात आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला. सोलंकी आणि भिडे या दोघांसह इतरांच्या मदतीने त्यांनी टीएमटीच्या ४७० बस प्रवासी निवाऱ्यांच्या मूळ जागी बीओटी तत्त्वावर निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शनाचे हक्क देण्याबाबतचा ठेका मिळण्यासाठी टीएमटीनेघेतलेल्या निविदा प्रक्रियेत जॉइंट व्हेंचरची तरतूद नसतानाही सोल्युशन अॅडव्हर्टायझिंग यांनी विश्वर पब्लिसिटी, झेनिथ आउटडोअर आणि गुज्जू अॅड. प्रा. लि. या कंपन्यांचा बनावट डीड तयार केला. याच कंपनीची तीन वर्षांच्या नफा-तोटा आणि ताळेबंदीबाबतची अपूर्ण कागदपत्रे जोडली. तरीही ‘सोल्युशन’ यांना बेकायदा ठेका मिळवून दिला. अशा प्रकारे गैरव्यवहार करून ‘सोल्युशन’ला ठेका मिळाल्यानंतर १० लाखांची इसारा रक्कम बेकायदा परत केली. अशाच वेगवेगळ्या प्रकारे सहा कोटी ७३ लाख ५५ हजारांचे टीएमटीचे आर्थिक नुकसान केल्याने ठाणे एसीबीने १ मार्चला अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.