थर्टी फस्ट साजरा करा.. पण जरा जपून! हुल्लडबाजी करणा-यांवर पोलिसांची करडी नजर
By जितेंद्र कालेकर | Published: December 21, 2017 11:30 PM2017-12-21T23:30:00+5:302017-12-21T23:30:00+5:30
थर्टी फस्टच्या नावाखाली हुल्लडबाजी करणा-यांवर ठाणे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेसह पोलीसही श्वास विश्लेषक यंत्रासह शहरातील नाक्यांवर वाहनांची तपासणी करणार आहेत.
जितेंद्र कालेकर
ठाणे: नाताळ तसेच थर्टी फस्ट आणि नववर्ष स्वागताची पार्टी जरुर करा... पण पार्टीच्या नावाखाली दारु पिऊन कुठेही हुल्लडबाजी करणा-यांवर पोलिसांकडून कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर येऊरच्या ७५ बंगलेधारक तसेच हॉटेल चालकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी या बंगलेधारकांवर राहणार असल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.
ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळामधील सर्वच ३५ पोलीस ठाण्यांचा आयुक्तांनी आढावा घेतला. नाताळ आणि ३१ डिसेंबर अर्थात २०१७ या वर्षाला निरोप देणारी आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्त येऊर, उपवन, कल्याणची खाडी किनारे, ढाबे आणि हॉटेल्समध्ये पाटर्यांचे बेत आखले जात आहेत. अनेकदा परवाना नसतांनाही अशा पाटर्यांचे आयोजन केले जाते. पार्टीच्या नावाखाली हुल्लडबाजी, धांगडधिगा घालून हाणामारीचेही प्रकार सर्रास घडतात. यावर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही करडी नजर ठेवणार आहेत. दोन वर्षापूर्वी येऊरमध्ये एका हॉटेलच्या आवारात पार्टी सुरु असतांना एकाने हवेत गोळीबार केला होता. या पार्श्वभूमीवर येऊरमध्ये विनापरवाना चालणाºया सर्व हॉटेल्सवर कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. विनापरवाना पार्टी करणा-यांवर टेहळणी करण्यासाठी ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आदी भागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १२ निरीक्षकांची पथके तैनात केल्याचे अधीक्षक नाना पाटील यांनी सांगितले.
येऊर, उपवनसह ठाण्यातील अनेक भागात विशेष बंदोबस्त ठेवल्याची माहिती वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी दिली. त्यासाठी नाकाबंदीही करणार असल्याचे ते म्हणाले. तर महामार्ग, हॉटेल्स आणि मॉल्स कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खास गस्ती पथकांची टेहळणी राहणार असल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
काय आहे नोटीशीमध्ये....
येऊरच्या खासगी बंगल्यांमध्ये पाटर्यांचे सर्रास आयोजन केले जाते. हा परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने घोषित केला आहे. त्यामुळे याठिकाणी डीजे लावला जाणार नाही. विनापरवाना अंमली पदार्थांचे किंवा मद्य सेवन होणार नाही. असे प्रकार आढळल्यास ज्या बंगल्यात पार्टी होईल, त्या बंगल्याच्या मालकाला जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याची नोटीस वर्तकनगर पोलिसांनी ७५ बंगलेधारकांना बजावली आहे.
मद्यपीला घरी सोडा
एखाद्या मद्यपीला जर ओव्हर डोस झालाच तर त्याला चालक देऊन सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी ही संबंधित हॉटेल चालकाची राहणार आहे. अशा ग्राहकाला घरी सोडण्याच्या सूचना हॉटेल चालकांना केल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी दिली.
वाहतूक विभागही करणार कारवाई
दारु पिऊन वाहन चालविणाºयांवरही ठाणे शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या १८ निरीक्षकांच्या पथकांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेचे ५०० अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. हे कर्मचारी श्वासविश्लेषक यंत्रणेद्वारेही तपासणी करणार आहेत. त्यामुळे मद्य प्राशन करून पार्टीला जाणारे आणि येणारे आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
...तर बिनधास्त करा पार्टी
नाताळ किंवा नववर्ष स्वागतासाठी जर पार्टीचे आयोजन करायचे असल्यास त्यासाठी ‘वन डे’ परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिला जातो. एका पार्टीसाठी गेल्या वर्षी १३ हजार रुपयांचा अधिकृत परवाना दिला जात होता. यंदा यात तीन हजार रुपये कपात केली असून दहा हजार रुपये भरून हा परवाना मिळविता येणार आहे. तो असेल तर बिनधास्त मद्य अर्थात ओली पार्टी करा... पण नसेल तर मात्र पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला तयार राहा, असा इशाराच अधीक्षक एन. एन. पाटील यांनी दिला आहे.