नितिन पंडीत
भिवंडी - गणरायाची भाद्रपद चतुर्थी निमित्त सर्वत्र मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला प्रथमच प्रतिनिधित्व देत भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांना संधी दिल्यानंतर त्यांच्यावर पंचायतराज राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली असून, केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर कपिल पाटील यांनी कुटुंबीयांसोबत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला.
भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर या निवासस्थानी कपिल पाटील यांनी सपत्नीक गणरायाची पूजा करून प्रतिष्ठापना केली. या प्रसंगी कपिल पाटील यांचे कुटुंबीय पुतणे जिल्हा बँक संचालक प्रशांत पाटील,जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील,नगरसेवक सुमित पाटील,पुत्र माजी सरपंच सिद्धेश पाटील सुना नातवंड सहभागी झाले होते.
परंपरागत गणेशोत्सव साजरा करीत असताना मंत्री झाल्यानंतर पहिला गणेशोत्सव असल्याने आपण आनंदी असल्याचे सांगत देशावर व जगावर आलेल्या कोरोनाचे संकट व तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता प्रत्येकांनी नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली असून सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.