ठाणे : साडेतीन वर्षांनंतर अस्तित्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या धोकादायक सभागृहामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय कॅम्पसमधील नियोजन भवनात सोमवार, १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे.जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीनंतर जि.प.च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची ही निवड एक आठवडा उशिराने होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी जबाबदारी पार पाडणार आहेत. या पदांसाठी उमेदवारी प्राप्त झालेल्यांपैकी पसंतीच्या उमेदवारास बोट उंच करून पसंती दर्शवण्याची पद्धत या निवड प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार असल्याच्या वृत्तास परदेशी यांनी दुजोरा दिला.जिल्हा परिषदेची प्रारंभीची ही सर्वसाधारण सभा खरे म्हणजे जिल्हा परिषदेत होणे अपेक्षित होते. मात्र, काही वर्षांपूर्वीच करोडो रुपये खर्च करून सुशोभीकरण केलेल्या या मुख्य इमारतीतील सभागृह धोकादायक असल्याचे तांत्रिक अहवालावरून उघड झाल्यामुळे ते कायमचे बंद करण्यात आले आहे. प्राचीन जुन्या इमारतींच्या तिसºया मजल्यावरील या सभागृहाचे मनमानीपणे कोट्यवधींचा खर्च करून सुशोभीकरण केले होते. पण, आता या इमारतीला भार पेलवत नसल्यामुळे सभागृहाचा मजला काढून टाकण्याचा सल्ला या तज्ज्ञांनी आधीच दिला आहे. यामुळे या सभागृहाऐवजी नियोजन भवनात ही पहिली सभा होणार आहे. यानंतरच्या सभांसाठीदेखील नियोजन भवनाचा वापर करण्याशिवाय जिल्हा परिषदेसमोर पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड नियोजन भवनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 4:06 AM