ठाणे: जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यामध्ये १३ ते १७ आँक्टोंबरची या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ठाणे जिल्हा नियंत्रण कक्षाने हवामान खात्याचा हवाला देत वर्तवली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाण्यास मनाई केली आहे.
मंगळवारी संध्याकाळी अचानक ढग दाटून आल्याने काळोख पसरला आणि ढगांच्या गडगडाटात व विजेच्या कडकडाटात काही वेळ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला. या दरम्यान विद्यूत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडीत झाला. यामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना विजे अभावी समस्येला तोंड द्यावे लागले. सध्या अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. तर विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
या चार दिवसांच्या कालावधीतील पावसाची शक्यता लक्षात घेऊन सुके अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेशी औषधे, पिण्यासाठी पाणी आदींची व्यवस्था नागरिकांनी करून ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२२-२५३०१७४० या दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाने केले आहे.