ठाणे: पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलण्याचे आवाहन काही तरुण मंडळींनी शास्त्रीनगर नाक्यावर रविवारी सादर केलेल्या पथनाटयातून केले. रेझिंग डे निमित्त वर्तकनगर पोलिसांनी जनजागृतीपर उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून हे पथनाटय सादर करण्यात आले. त्याप्रसंगी हे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे च्या अनुषंगाने रविवारी सायंकाळी वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम आणि संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान शास्त्रीनगर नाका येथे पोलिसांचा नागरिकांशी संवाद या विषयावर पथनाट्य आयोजित केले होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अजय तिडके, सुरेश लोटे, अंमलदार व गोपनीय अंमलदार यांच्यासह पथनाट्य सादर करणारे किरण नाकती यांचे १० ते १२ सहकारी सहभागी झाले होते.
पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलून पोलिसांना मदतीसाठी पुढे आले पाहिजे. यातून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालता येईल, एक चांगला समाज घडविता येईल, असा संदेश यातून देण्यात आला. एखाद्या मुलीची छेड काढली जात असतांना किंवा अनुचित प्रकार घडत असतांना केवळ पोलिसांवरच जबाबदारी न टाकता साध्या वेषातील नागरिकांनीही कर्तव्य भावनेने मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असा संदेशही यातून देण्यात आला.