फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या, ‘एटीएम’वर लोकांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:09 AM2020-06-27T00:09:28+5:302020-06-27T00:09:33+5:30
एटीएममध्ये आलेल्या नागरिकांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्या एटीएमकार्डची चोरी करून त्याद्वारे पैसे काढून फसवणूक करणा-या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांना गुरुवारी यश आले.
भिवंडी : कोनगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील एटीएममध्ये आलेल्या नागरिकांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्या एटीएमकार्डची चोरी करून त्याद्वारे पैसे काढून फसवणूक करणा-या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांना गुरुवारी यश आले.
२४ जून रोजी कोनगाव येथील युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीची फसवणूक करत आपल्याकडील बनावट एटीएमकार्ड त्या व्यक्तीस देऊन त्याच्या एटीएमकार्डातून २५ हजार काढल्याचा गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या पथकाने ठिकठिकाणी सापळा लावला. एटीएममधून पैसे काढून फसवणूक करणारे तिघे कोनगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेऊन चौकशी केली असता त्यांनी २४ जून रोजी २५ हजार रुपये काढल्याचे कबूल केले.
१० जून रोजी युनियन बँकेच्या एटीएममधून ६९ हजार काढल्याची कबुली दिली. या त्रिकुटाकडून ४७ हजार रोख, दोन मोबाइल व दुचाकी असा १ लाख ३९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.