ठाणे: जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या कर्मचारी अधिसंख्ये पदावर सध्या कार्यरत आहेत. तर बहुतांशी कर्मचारी सेवा निवृत्त झाले, काहींचे निधनही झाले मात्र त्यांना शासनाच्या विविध सेवांचा लाभ मिळाला नाही. तो मिळावा म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमरण उपोषणाला बसलेल्या या कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी संध्याकाळी भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री आले असता त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या उपोषण स्थळी भेट दिली. याचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांनी त्यांना लेखी निवेदन दिले आणि त्यांच्या समक्ष मुख्य सचिवांना दूरध्वनी करून या अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी बैठक लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. त्यामुळे या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव व्यक्त केला जात आहे.
या कर्मचाऱ्यांनी आॅर्गनाईझेशन फॉर राईटस् आॅफ ह्युमन (आॅफ्रोह) या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत अमरणपोषण सुरू केले आहे. आजचा त्यांचा पहिला दिवस आहे. त्यांच्या या अमरण उपोषणाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस भास्कर गव्हाळे, अध्यक्षा प्राची चाचड आदींनी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याचे गव्हाळे यांनी सांगितले.
अनुसूचित जमातीच्या कर्मचाºयांचे अस्सल जात प्रमाणपत्र, वादग्रस्त जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फसवणूक करुन अवैध व जप्त केल्याचा आरोप या उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या कर्मचाºयांना ११ महिन्यांसाठी अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे. मागील ३३ महिन्यात एक हजार अधिसंख्य कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांना पेन्शन लागू केली नाही, तर मयत कर्मचाºयांच्या वारसांना कुटुंबनिवृत्ती वेतनसुध्दा दिले नाही.
सरकारने २० सप्टेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे लक्षात आणून दिले होेते. पण तसे न झाल्यामुळे या कर्मचाºयांनी आता अमरण उपोषणाचे हत्यार उपसून आजपासून बेमुदत उपोषण राज्यभर सुरू केले आहे. ठाण्यातील या कर्मचाºयांच्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन आज दिले आहे. या उपोषणात आनंदाराव सोनावणे, सुधाकर कोळी, मुरलीधर हेडाऊ, प्रिया रामटेककर,दयानंद कोळी, रविंद्र निमागावकर, अर्जुन मेस्त्री, घनश्याम हेडाऊ, पांडूरंग नंदनवार, प्रकाश कोळी, नरेंद्र भिवापूरकर सुधीर मग्गीरवार आदी कर्मचाºयांनी सहभाग घेतला.