- धीरज परब
मीरारोड - महापालिकेच्या भार्इंदर अग्नीशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुध्दी करणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन गॅसची मध्यरात्री गळती होऊन अग्नीशमन दलाच्या ५ जवानांसह एकुण ७ जणांना क्लोरीनची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाय परिसरातील तीन मोठ्या इमारती तातडीने रीकाम्या करुन रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले .
भार्इंदर पश्चिमेस कमला पार्क येथे महापालिकेचे मुख्य अग्नीशमन केंद्र आहे. तर याच ठिकाणी परिसराला पाणी पुरवठा करणारा पालिकेचा उंच जलकुंभ आहे. जलकुंभातील पाणी शुध्द करण्यासाठी नियमीतपणे क्लोरीनचा वापर केला जातो . त्यासाठी मुंबईच्या एक्वाटॅक इंटरप्रायझेस या ठेकेदार कंपनीकडून क्लोरीन भरलेल्या सिलेंडरचा पुरवठा होतो. १६३ किलो वजनाच्या या सिलेंडर मध्ये १०० किलो क्लोरीन असतो.
गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास शुध्दीकरणासाठी लावलेल्या सिलेंडरमधून क्लोरीनची गळती सुरु झाल्याने एकच खळबळ माजली. गळती मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने अग्नीशमन दलाचे सब फायर स्टेशन अधिकारी जगदीश पाटील सह लिडिंग फायरमन रविंद्र पाटील, फायरमन संतोष मशाळ, संजय म्हात्रे, रोहित पाटील, संतोष पाटील, धनीलाल गावित, चालक हर्षद अधकारी, तुषार भोईर सह पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उत्तम रणदिवे, मेस्त्री विठ्ठल धोंगडे, व्हॅल्वमन उत्तरायन दोराईराज, सुरक्षा रक्षक निखीलेश तिवारी यांनी गळती रोखण्यासाठी धाव घेतली.
गळती सिलेंडरच्या तळाकडून होत असल्याने आधी साबण लाऊन गळती थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु क्लोरीनचा दाब प्रचंड असल्याने ते प्रयत्न अपयशी ठरले. त्या नंतर अग्नीशमन दलाच्या दोघा जवानांनी श्वसन उपकरण वापरुन सिलेंडरवर सतत पाण्याचा मारा सुरु केला. क्लोरीनच्या गळतीमुळे मदतकार्य करणारया कर्मचारयां सह लगत असलेल्या रुची टॉवर, कमला पार्क इमारतीतील रहिवाशांना मळमळ व उलट्या होऊ लागल्या. श्वासनास त्रास होऊ लागला. लहान मुलांना तर जास्तच त्रास जाणवू लागला. त्यामुळे तातडीने येथील इमारती रीकाम्या करुन रहिवाशांना सुरक्षित ठिकाण हलवण्यात आले. गॅस गळतीच्या वृत्ताने परिसरात घबराट माजली.
क्लोरीनची गळती रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अग्नीशमन दलातील जगदीश पाटील, संजय म्हात्रे, संतोष माशाळ, रोहित पाटील, हर्षद अधिकारी यांच्या सह व्हॉल्वमन उत्तरायण व सुरक्षा रक्षक निखिलेश तिवारी यांना क्लोरीनची बाधा होऊन अत्यावस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल कण्यात आले. यातील जगदीश, संतोष व संजय हे अजुनही मीरारोडच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत.दरम्यान, मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास सिलेंडरला जोडलेला पाईप कापून सिंलेडर हा अग्निशमन दलाच्या पीकअप गाडीतून नेऊन भार्इंदर पश्चिमेस खाडीत टाकण्यात आला. मध्यरात्री सव्वा तीन वाजता जवानांनी खाडी किनारी पुन्हा जाऊन क्लोरीन सिंलेडर टाकलेल्या खाडी परिसराची पाहणी केली .
क्लोरीनची गळती मध्यरात्री झाली असताना ठेकेदार कंपनीचे कर्मचारी आज शुक्रवारी सकाळी आले. क्लोरीन सारख्या घातक वायुची गळती झाल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणाच नसल्याचं उघड झालं आहे.
क्लोरीन गळती रोखण्यासाठी केवळ अग्नीशमन दलाच्या दोनच जवानांनी श्वसन उपकरण मास्क वापरले . वास्तविक सदर गळतीमुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता होती. मुख्य अग्नीशमन केंद्रात ८ श्वसन उपकरण यंत्र असून त्यातील दोन पुर्वी वापरलेली होती तर काल मध्यरात्री दोन वापरण्यात आली. पण अन्य चार श्वसन उपकरण केंद्र चालु होती का ? की ती नादुरुस्त आहेत या बद्दलची माहिती मिळालेली नाही.