गड-किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, बँकांनी पुढाकार घ्यावा- बाबासाहेब पुरंदरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 03:50 PM2018-01-08T15:50:33+5:302018-01-08T20:03:57+5:30
राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र त्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये.
डोंबिवली - राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र त्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये. तर स्थानिक नागरिक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, बँक आणि कारखाने यांनी किल्ल्याची स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी डोंबिवलीमध्ये सांगितले.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक असून, त्याची देखभाल, दुरुस्ती केली पाहिजे. चांगली स्थळं चांगली ठेवावी हे आपल्या मनात सुद्धा येत नाही. सौंदर्यावरील आपले प्रेम कमी झाले, अशी खंतसुद्धा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडली. मात्र भिडे गुरुजींबाबत बोलण्यास नकार दिला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डोंबिवलीजवळील कासारियो सिटीमधील रहिवासी आणि मराठी उद्योजक सुधीर गुप्ते यांच्या घरी आले होते. यावेळी मनसे नेते राजू पाटील यांनी शिवशाहीर यांची भेट घेत आशीर्वाद घेतला. याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सागर जेधे आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.