नियोजन सोडून, शहर अभियंता रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:31 AM2019-09-17T00:31:13+5:302019-09-17T00:31:23+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांतील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा मृत्यू तसेच ते जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा मृत्यू तसेच ते जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीतही भर पडत असल्याने महापालिका प्रशासन टीकेचे लक्ष्य होत आहे. असे असतानाही प्रशासनाने खड्डे भरण्याचे योग्य नियोजनच केले नाही. जनसामान्यांसाठी महत्त्वाचे असलेले नियोजन वाऱ्यावर सोडून शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली या गणेशोत्सवात आयुक्त गोविंद बोडके यांच्या परवानगीविनाच रजेवर गेल्याची बाब उघडकीस आली आहे.
खड्डे भरण्यावर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. खड्डे भरण्याचे नियोजन फेब्रुवारीत होणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा ते झाले नाही. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या कामात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जुंपले गेले. आचारसंहितेमुळे खड्डे भरण्याचे विषय मंजूर होण्यास विलंब झाला. आचारसंहितेच्या कचाट्यातून खड्डे भरण्यासारखे महत्त्वाचे विषय वगळावेत, अशी विनंती महापालिका प्रशासनातर्फे आयुक्तांनी निवडणूक आयोगाला केली होती. आयोगाने त्याला सूट दिल्यावर त्यानंतर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्डे भरण्याच्या विषयाला मंजुरी मिळाली. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविले जाणे अपेक्षित होते. आयुक्तांनी तसे आदेशही दिले होते. मात्र, प्रशासनाने ते गांभीर्याने घेतले नाहीत.
२६ जुलै, ४ आॅगस्ट, ४ सप्टेंबर या तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची दैना झाली. अनेक रस्ते वाहून गेले. तर, अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे खड्डे नागरिक व वाहनचालकांच्या जीवावर बेतले आहेत. आधीच कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची पूलकोंडी झालेली असताना त्यात खड्ड्यांची भर पडली.
कल्याण शहरात मागील वर्षीही खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी तत्कालीन शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. कुलकर्णी निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी सरकारने सपना कोळी-देवनपल्ली यांची नियुक्ती केली.
शहरात गणेशाचे आगमन व विसर्जन खड्डेमय रस्त्यांतूनच झाले. या कालावधीत कोळी-देवनपल्ली यांनी शहरात असणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी गणेशोत्सवात रजेचा अर्ज बोडके यांच्याकडे सादर केला होता. मात्र, त्यावर आयुक्तांनी सही केली नाही. चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असा शेरा आयुक्तांनी अर्जावर मारला होता. तरीही, कोळी-देवनपल्ली यांनी आयुक्तांना केवळ रजेचा अर्ज माहितीसाठी असल्याचे कळवत रजेवर जाणे पसंत केले. आयुक्तांनी त्यांच्या रजेचा अर्ज मंजूर केलेला नसतानाही त्या रजेवर गेल्या. आयुक्त व शहर अभियंता हे पद समकक्ष असल्याचे कारण देत त्यांनी ही कृती केली आहे. यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
>प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आयुक्तांना जुमानत नाहीत. यापूर्वी मुख्य लेखा व वित्त अधिकारी का.बा. गर्जे यांच्यातील वाद नगरविकास खात्यापर्यंत पोहोचला होता. तोच कित्ता कोळी-देवनपल्ली गिरवत आहेत. उपायुक्त धनाजी तोरसकर हे देखील न सांगताच रजेवर गेले होते.