नदीकिनारी दररविवारी साफसफाई; खडवली येथे तरुणाईचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:14 AM2019-06-06T00:14:15+5:302019-06-06T00:14:21+5:30
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील खडवली या रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर खडवली-भातसा नदी आहे.
टिटवाळा : कडक उन्हाळ्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर खडवली येथे भातसा नदीपात्रात पोहायला येतात. त्यामुळे येथे उन्हाळी पिकनिक पॉइंट तयार झाले आहे. मात्र, याठिकाणी पर्यटकांकडून कचरा होत असल्याने नदीकिनाऱ्याच्या साफसफाईसाठी निसर्गसंवर्धन समितीने पुढाकार घेतला असून दररविवारी येथे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यामध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील खडवली या रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर खडवली-भातसा नदी आहे. याठिकाणी मुंबई, ठाण्यासह लगतच्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, वासिंद, शहापूर तसेच नाशिक जिल्ह्यातून हजारो पर्यटक येतात. काही हुल्लडबाज पर्यटक तेथेच मद्यपान करून रिकाम्या बाटल्या फोडतात. तसेच खाद्यपदार्थांचे पॅकिंग, प्लास्टिक पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा होत आहे. ग्रामस्थ याच नदीपात्रात गाड्याही धुतात. विशेष म्हणजे, या नदीपात्रातून शेजारच्या गावांना कुठलीही प्रकिया न करता स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत) प्रशासनाकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. सांडपाणीही थेट नदीत सोडले जात असून शेवाळ तयार झाले आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आहे. स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व प्रशासनाकडे मागणी करूनही उपाययोजना न झाल्याने तरुणांनी पुढाकार घेऊ न समितीने दररविवारी स्वच्छता हाती मोहीम सुरू केली आहे.
खडवली-भातसा नदीवरील पिकनिक पॉइंटवर रविवारी तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. काही हुल्लडबाज पर्यटक मद्याच्या बाटल्या तेथेच फोडतात तसेच मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा होत आहे. त्यामुळे समितीच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. - सागर लोणे, निसर्गसंवर्धन समिती