किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमांमुळे गड पुन्हा जीवंत होतो - प्रदीप केळकर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 29, 2024 05:52 PM2024-04-29T17:52:59+5:302024-04-29T17:55:12+5:30
किल्ले हा महाराजांनी दिलेला ठेवा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
ठाणे : सह्याद्री परिक्रमा सगळेच करतात पण या सह्याद्रीकडून आपण काय घेतो? असा प्रश्न उपस्थित करत किल्ल्यांची वाताहत होत असल्याची खंत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक प्रदीप केळकर यांनी व्यक्त केली. सह्याद्रीने माणुसकी शिकवली, अनेक माणसे जोडली. किल्ल्यावर जाणारे प्लास्टीकचा कचरा करतात पण अनेक सेवाभावी संस्था प्लास्टीकमुक्त मोहीम येथे राबवत असल्याचे आहेत. या मोहीमांमुळे पुन्हा तो गड जीवंत होतो. किल्ल्याचे स्वरुप दयनीय झाले आहे पण सरकारला दोष देण्यापेक्षा तो किल्ला स्वच्छ ठेवणे ही आपली देखील जबाबदारी आहे. किल्ले हा महाराजांनी दिलेला ठेवा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवसमर्थ विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित व श्रीकृपा प्रकाशन प्रकाशित ‘सह्याद्री परिक्रमा’ या पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी केळकर यांनी वरील विधान केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात उद्योजक रविंद्र प्रभुदेसाई म्हणाले की, सह्याद्रीचे अभेद्य कवच असल्यामुळेच इथल्या पर्यावरणाची जपणूक झाली व निसर्गसंपन्नता वाढली. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकारण्यात बहुमोल योगदान दिले. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ म्हणाले की, इतिहासात रमण्यापेक्षा त्यातून बोध घेतला पाहिजे. इतिहास हा विषय मार्कापुरता मर्यादीत राहू नये. ठाण्यात वस्तुसंग्रहालय उभे राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने आपण प्रयत्नरत असल्याचे सांगत नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी असून त्यांनी मुलांना मॉलऐवजी म्युझियमची सफर घडवावी असा पर्याय त्यांनी सांगितला.
आनंद विश्व गुरूकुलचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी ५० वर्षांपासूनच्या टेटविलकरांशी असलेल्या मैत्रीच्या आठवणींचा पट खुला करीत साधेपणा आणि सहनशीलता हा त्यांचा महत्वाचा गुण असल्याचे सांगितले. सुरूवातीला टेटविलकर यांनी आपल्या मनोगतात १९८३ मध्ये चार मित्रांसह केलेल्या सह्याद्री परिक्रमेच्या आठवणी सांगताना दुर्गप्रेमी गो.नी.दांडेकर यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रोत्साहक वरदहस्त याचा विशेष उल्लेख केला. सीमा टेटविलकर – कोंडे यांनी भावना व्यक्त करताना आपल्या वडिलांनी केलेल्या साधेपणाच्या संस्कारांचा आवर्जुन उल्लेख करीत त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपसुक तयार झाला आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची जडणघडण होत गेली. महेंद्र कोंडे यांनी सूत्रसंचालन केले.