उल्हासनगरात २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद
By admin | Published: August 24, 2015 02:30 AM2015-08-24T02:30:02+5:302015-08-24T02:30:02+5:30
शहरात मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फलू आदींच्या रुग्णांत वाढ झाली असताना आरोग्य विभागातील २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद आहेत. जंतुनाशके
उल्हासनगर : शहरात मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फलू आदींच्या रुग्णांत वाढ झाली असताना आरोग्य विभागातील २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद आहेत. जंतुनाशके, मलेरिया आॅइल, ब्लिचिंग पावडर आदी साहित्याचा साठा उपलब्ध नसल्याने विभागाचा सावळागोंधळ उघड झाला आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी लोकमतच्या बातमीची दखल घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची पाहणी केली.
महापालिका हद्दीत स्वाइन फलूच्या ८ पॉझिटिव्ह रुग्णांसह २५ डेंग्यू, ५२ मलेरिया व व्हायरल तापाच्या १५०० रुग्णांची नोंद झाल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पालिका आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. जंतुनाशके, मलेरिया आॅइल, ब्लिचिंग पावडर, धूरफवारणीची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. धक्कादायक माहिती म्हणजे आरोग्य विभागाच्या २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे कित्येक महिन्यांपासून बंद असून इतर यंत्रे नावालाच सुरू असल्याचे उघड झाले आहे.
जंतुनाशकांसह इतर साहित्य खरेदीवर पालिकेने लाखो-कोट्यवधींचा खर्च करूनही मलेरिया आॅइल, जंतुनाशके कोणत्या प्रभागात व परिसरात टाकली, याची नोंद नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. लाखो नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांच्यासह वरिष्ठावर कारवाई करण्याची मागणी आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे. पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी शासकीय तसेच खाजगी दवाखान्यातील रुग्णांची नोंद ठेवली असून पालिका आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. पालिकेचे स्वत:चे रुग्णालय नसल्याने शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. गरज पडल्यास विशेष कक्ष उघडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.