लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापौर आणि आयुक्त यांच्यातील वाद अद्याप शमन्याची चिन्हे दिसत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुख्यालयात सुरूअसलेली पदाधिकाऱ्यांच्या कॅबीनच्या दुरुस्तीची कामे प्रशासनाने अचानक बंद केली आहेत. परंतु,ती का थांबविली याची उत्तरे देण्यास प्रशासन तयार नसल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसापासून महापौर आणि आयुक्त यांच्यात अनेक मुद्यांवरुन वाद सुरु आहेत. त्याचे पडसाद पालिकेत पडत आहेत. या दोघांमधील वादामध्ये आता विकास कामांनादेखील खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौरांनी नुकतेच आयुक्तांना पत्र दिले असून या पत्रानुसार महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच काम करावीत,अशी मागणी केली आहे. प्रशासनाच्या अर्थसंकल्पानुसार कामे करु नयेत असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी ही कामे थांबविली असून नवीन कोणतीही कामे करु नयेत, असे आदेश संबधींत विभागांना दिले आहेत. त्याचाच फटका आता कदाचित पालिका मुख्यालयातील विविध पदाधिकाऱ्यांच्या सुरु असलेल्या कॅबीन दुरुस्तीलादेखील बसल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या कार्यालयांच्या दुरु स्तीचे काम प्रशासनाने तडकाफडकी थांबविले आहे. पालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी बोलावलेल्या विशेष सभेत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रशासनावर, विशेषत: आयुक्तांवरही टीका केल्याने प्रशासनाने ही कामे थांबवली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. दुसऱ्या मजल्यावर विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी आता अतिक्र मण विभागानेच अतिक्र मण केल्याने विरोधी पक्ष नेत्याचे कार्यालय पहिल्या मजल्यावर हलवणाच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयाची कामेदेखील सुरु केली होती. मात्र ती अचानक थांबवली आहेत. कामे अचानक का थांबवण्यात आली अशी विचारना महापौर मीनाक्षी शिंदे यांनी संबधींत अधिकाऱ्यांकडे केली असता, ती का बंद केली याचे उत्तरच अधिकाऱ्यांकडे नव्हते.
शीतयुद्धाचा फटका पदाधिकारी दालनांना
By admin | Published: May 10, 2017 12:03 AM