डोंबिवलीतील कंपन्या अद्यापही बंदच; उद्योजकांचे सावध पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:24 AM2020-07-25T00:24:44+5:302020-07-25T00:24:48+5:30
धास्ती कोरोनाची
डोंबिवली : केडीएमसी हद्दीत सोमवारपासून हॉटस्पॉट वगळता अन्य ठिकाणचे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या धास्तीमुळे डोंबिवली एमयडीसीतील उद्योजक आपल्या व्यवसायाचा शुभारंभ करायला तयार नसल्याने कंपन्या बंदच आहेत.
डोंबिवली एमआयडीसीत साधारण ४२० कंपन्या आहेत. मात्र, अनलॉक-१ मध्ये त्यापैकी अत्यावश्यक सेवेतील सुमारे ८५ कंपन्या सुरू झाल्या होत्या. परंतु, केडीएमसी हद्दीतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे त्यापैकी बहुतांशी कंपन्याही भीतीमुळे बंद झाल्याची माहिती कारखानदारांच्या ‘कामा’ या संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.
ते म्हणाले की, कोरोनामुळे उद्योजक घाबरले आहेत. कंपन्या त्यांनी सुरू केल्यास सर्व यंत्रणा त्यांना सहकार्य करेल. मात्र, त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. घरडा केमिकल्स ही मोठी कंपनीही सुरू होऊन पुन्हा बंद करण्यात आली. ही कंपनी या आठवड्यात सुरू होणार होती, पण काय झाले आहे, हे माहिती नाही.
नोकरीच्या संधी उपलब्ध
वेल्डर, फिटर, हेल्पर, केमिस्ट अशा नोकरीच्या संधी उपलब्ध असून, नोकरीची गरज असलेल्या व्यक्तींनी कामा संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. डोंबिवलीत विविध उत्पादन घेणाऱ्या कंपन्या असून, कामगारही उपलब्ध आहेत, उद्योजकांनी आत्मविश्वासाने उद्योग सुरू करावेत. उत्पादनांना भरपूर मागणीही असल्याने उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन सोनी यांनी केले.