लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात बल्याणी येथील चाळींतील हजारो रहिवासी बाधित होणार आहेत. भरपाईचा शासकीय मोबदला विकासक, चाळीच्या जमीनमालकांनी घेऊन आम्हाला वंचित ठेवले आहे. जोपर्यंत मोबदला मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यासाठी भूसंपादन करू दिले जाणार नाही, असा इशारा चाळीतील रहिवाशांनी दिला आहे. प्रसंगी प्रांत कार्यालयासमोर उपोषणही करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी दिला आहे.
बल्याणी परिसरात अनेकांनी जमीन मालकांकडून चाळींतील घरे खरेदी केली आहेत. या घरांचे वीजदेयक, मालमत्ताकर हेच चाळीतील रहिवाशीच भरतात. मुंबई-वडोदा महामार्गात या भागांतील दोन हजार चाळी बाधित होणार आहेत. परंतु, या जमिनीचा मोबदला मूळ जमीनमालकांना मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत गायब झालेले जमीनमालक पुन्हा चाळींच्या जागेचा मोबदला घेण्यासाठी या भागात हजर झाले आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
बाधितांना प्रत्येक घराप्रमाणे सुमारे सात ते आठ लाख रुपये भरपाई निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण २८ कोटी २८ लाखांचा निधी बाधितांना देण्याचे महसूल विभागाने प्रस्तावित केले आहे. परंतु, चाळीमालकांनी रहिवाशांचा मोबदला स्वत: घेऊन त्यातील अर्धी रक्कमच रहिवाशांना देण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षण यादीत आमचे नाव असल्याने पूर्ण मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे, अशी रहिवाशांची मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी रहिवाशांनी याबाबत तत्कालीन आमदार जगन्नाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांच्याकडे केली होती. आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बैठक घेऊन बाधित होणाऱ्या चाळीतील रहिवाशांना मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य करत चाळीतील बाधित रहिवाशांना मोबदला द्यावा, असे आदेश महसूल अधिकाऱ्यांना दिले होते.
दरम्यान, कळव्यातील एका विकासकाने नांदप भागात बांधलेली चाळींतील घरे विकली होती. परंतु, त्याने आता रस्त्याचा मोबदला चाळीतील रहिवाशांना मिळून देण्याऐवजी स्वतः घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार फाटक यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
---------------
चाळीतील रहिवाशांनी घरे खरेदी करताना घरांची अधिकृत नोंदणी केलेली नाही. त्यांनी केवळ नोटरी करून घरे घेतली आहेत. प्रकल्पाकरिता भूसंपादन करताना नोटरी पद्धत ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे जमीनमालकांना मोबदला दिला आहे. बाधित चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा हमीपत्र मोबदला देताना महसूल विभागाने जमीन मालकांकडून घेतले आहे. जमीन मालक बाधित रहिवाशांची फसवणूक करीत असतील तर त्यांनी तक्रारी कराव्यात. त्याची गंभीर दखल घेतली जाईल.
- अभिजीत भांडे-पाटील, उपविभागीय अधिकारी, कल्याण
----------------