भिवंडी : निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, या कारणास्तव काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी दिली नसल्याचा आरोप काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी मंगळवारी केला.
मी शेतकरी आहे. माझ्याकडे किती पैसे असू शकतात? २०१४ साली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला उमेदवारी दिली. तेव्हा पैशांचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. मग, आता पैशांचा मुद्दा का कुणी उपस्थित केला? ही पक्ष चालवण्याची पद्धत नाही. पाणी, रोजगार, सिंचन, शेती यासाठी मी गेली अनेक वर्षे लढत आहे. २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी मला ८९ हजार मते मिळाली.
२०१४ साली काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली. तेव्हा मला तीन लाख मते मिळाली. मोदीलाट असतानाही तीन लाख मते मिळाली, ही थोडीथोडकी मते नव्हती. कोकणपट्ट्यात कुणबी समाजाचे ६५ टक्के मतदार आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या ४० टक्के आहे. मी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदावर काम केले. राणे यांनी काँग्रेस सोडली, तेव्हा रत्नागिरीत मला स्टार प्रचारक म्हणून पाठवले होते. मला उमेदवारी द्यायची नव्हती, तर पाच महिन्यांआधीच ही बाब पक्षाने स्पष्ट करायला हवी होती. आता ऐनवेळी सगळी संभ्रमावस्था निर्माण करून उमेदवारी नाकारली आहे. कुणबीसेना आणि शेतकऱ्यांच्या इच्छेखातर मी पुन्हा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक लढवत आहे. त्यामुळे काँग्रेसशी मी गद्दारी केली अथवा बंडखोरी केली, असे म्हणता येत नाही.
भाजपच्या सांगण्यावरून आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या आरोपावर पाटील म्हणाले की, या भागातील प्रश्नांविषयी चर्चा करण्याकरिता मला मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते. त्यादिवशी त्यांची माझी भेट झाली. त्यांनी माझे काही प्रश्न सोडवण्याचे मान्य केले आहे. याचा अर्थ माझ्या उमेदवारीमागे भाजप आहे, असा होत नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.संभ्रम निर्माण करण्यामागे भाजपचा हात - टावरेटावरे यांना मंगळवारी काँग्रेसने ए, बी फॉर्म दिले. त्यासाठी ते प्रदेश कार्यालयात रात्रीपासून ठाण मांडून बसले होते. तिकडे बाळ्यामामांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठली होती. हा नेमका काय प्रकार आहे, अशी विचारणा केली असता टावरे यांनी सांगितले की, मुकुल वासनिक यांच्या सहीनिशी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझे नाव होते.मला उमेदवारी मिळणार, हे निश्चित होते. कोण प्रयत्नशील होते, त्याचे काय झाले, हे आता उघड झाले आहे. ए,बी फॉर्म मला दिला जाणार नाही, अशी अफवा पसरवली गेली होती. यामागे भाजपचे राजकारण होते. पराभवाची भीती वाटू लागल्याने त्यांनी अपप्रचार करून काँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप टावरे यांनी केला.विश्वनाथ पाटील यांच्या बंडखोरीविषयी टावरे म्हणाले की, २००९ साली मी लोकसभा निवडणुकीत विजयी झालो असतानाही २०१४ मध्ये माझ्याऐवजी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, मी अवाक्षरही काढले नाही. विद्यमान खासदाराएवजी त्यांना उमेदवारी दिली, यापेक्षा पक्षाने त्यांना काय द्यावे, असा प्रश्न टावरेंनी केला.निवडणुकीसाठी पैसे नाहीत, म्हणून पक्षाने उमेदवारी नाकारली, हा पाटील यांचा दावा हास्यास्पद आहे. मागच्यावेळी त्यांच्याकडे पैसे होते व आता ते संपले, असे काही आहे का? आपण काय बोलतो, याचा संदर्भ तरी नीट लागला पाहिजे, असा सल्ला टावरे यांनी दिला.