मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या १३६९ कोटी १६ लाखांच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपाने विरोधी पक्षातील शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी तरतूद केलेली नाही. शिवसेना-काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभाग सिमिती निधीवर टांगती तलवार आहे. सद्याच्या चालू आर्थिक वर्षात देखील त्यांची बहुतांश कामं रोखण्यात आली असून आमच्या प्रभागांमध्ये भाजपाला नागरिकांनी मतदान केलं नाही म्हणून त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी विकासकामं रोखल्याचा आरोप काँग्रेस - शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.आॅगस्ट २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ६१ नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. तर शिवसेनेचे २२ व काँग्रेसचे १२ नगरसेवक आहेत. महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्याने स्थायी समिती, प्रभाग समिती व अन्य समित्यांवर भाजपाचेच एकहाती वर्चस्व आहे. भाजपाच्या एकहाती सत्तेचं नेतृत्व आमदार नरेंद्र मेहता यांच्या हाती आहे. यंदाचे १२१३ कोटी ३२ प्रशासनाचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी स्थायी समितीला सादर केल्या नंतर आमदार, महापौर यांनी अंदाजपत्रकावर पालिका अधिका-यांची बैठक बोलावली होती. पुढे स्थायी समितीमध्ये चर्चा झाल्यानंतर सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी बुधवारच्या महासभेत १३६९ कोटी १६ लाखांचे अंदाजपत्रक महापौर डिंपल मेहता यांना सादर केले. सदर अंदाजपत्रक भाजपाने बहुमताने मंजूर केले.अंदाजपत्रकात शिवसेना व काँग्रेस नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी तरतूद केली नसल्याचा आरोप सभेत करण्यात आला. यामध्ये प्रभाग समिती निधी हा पूर्वीप्रमाणे प्रत्येक नगरसेवकास १५ लाख रुपये या प्रमाणे देण्याची मागणी शिवसेना - काँग्रेसने केली होती. परंतु भाजपाने ती बहुमताने फेटाळली.वास्तविक पूर्वीपासून प्रभाग समिती निधी हा थेट नगरसेवकांना दिला जात होता. १५ लाख रुपये इतका प्रभाग समिती निधी नगरसेवक ते सुचवतील त्या विकासकामांसाठी केले जात होते. परंतु यंदा मात्र भाजपाने अंदाजपत्रकात प्रभाग समिती निधी हा नगरसेवकांसाठी स्वतंत्र ठेवलेला नाही. प्रभाग समिती निहाय त्याची एकत्र तरतूद केली आहे.सर्व ६ प्रभाग समित्यांमध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असुन त्यांचाच सभापती आहे. त्यामुळे प्रभाग समिती निधीचा वापर हा समिती सभेत बहुमताने घेतला जाण्याची शक्कल भाजपाकडून लढवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी समितीमध्ये सदर निधी बहुमताच्या बळावर भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांमध्येच खर्च करुन सेना व काँग्रेस नगरसेवकांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास सेना - काँग्रेस नगरसेवकांना केवळ नगरसेवक निधीवरच समाधान मानावे लागणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भाजपा नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना त्यांच्या प्रभागातील विकास कामं सुचवण्यास सांगण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी विकासकामं सुचवली होती. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागां मध्ये विकास कामांसाठी आर्थिक तरतूद ठेवतानाच सेना - काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मात्र पालिका निधीतून कामं करण्याची तरतूदच ठेवण्यात आलेली नाही.नवघरच्या साईबाबा नगर मधील तरण तलावाचे काम देखील सेना नगरसेवकांच्या प्रभागात आहे म्हणुन रद्द करण्यात आले. त्यासाठी आर्थिक तरतुदच केली नाही. तो निधी दुसरी कडे वळवण्यात आला. असे एक नाही अनेक प्रकार आहेत. शिवाय आम्ही प्रभागातील रस्ते काँक्रिट करणे, मोठे नाले बांधणे, नाल्यांवर स्लॅब टाकणे, उद्यानांमध्ये विविध विकास कामं होणार नाहीत अशी भीती सेना - काँग्रेस नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.भाजपाची सत्ता आल्यापासून चालू आर्थिक वर्षातदेखील आमच्या प्रभागांमध्ये कामं काढलेली नाहीत. ज्या कामांच्या मागण्या केल्या होत्या त्या सुद्धा आम्हाला निधी नाही म्हणून पालिकेने गुंडाळून ठेवल्या आहेत. भाजपातील सूत्राने देखील विरोधी पक्षातील सेना - काँग्रेसच्या प्रभागातील कामांना कात्री लावल्या बद्दल दुजोरा दिला. महापौर डिंपल मेहता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
प्रतिक्रिया :मीरारोड भागातील काँग्रेस नगरसेवक असलेल्या तीनही प्रभागांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, नाले, उद्याने आदी विविध विकास कामांसाठी भाजपाने तरतूद केलेली नाही. काँग्रेसचे नगरसेवक आहेत म्हणून सूडबुद्धीनं हा निंदनिय प्रकार सत्ताधारी भाजपा नेतृत्वाने चालवला आहे. - जुबेर इनामदार ( काँग्रेस गटनेते )मतदान केलं नाही म्हणून त्या प्रभागातील विकासकामं होऊ द्यायची नाही अशी सुडबुद्धी भाजपाने नागरीकांवर चालवली आहे. सत्तेची मस्ती चढली असून हुकुमशाही चालवली आहे. प्रशासन पण त्यांच्या दबावाखाली नाचत आहे. पण या विरोधात आम्ही जनआंदोलन उभारु. - निलम ढवण ( नगरसेविका , शिवसेना )आम्ही स्थायी समितीमध्ये शिवसेना-काँग्रेसच्या नगरसेवकांना एकत्र घेऊन चर्चा करुन कामं प्रस्तावित केली आहेत. सर्व नागरिक आमच्यासाठी सारखे असून प्रत्येक प्रभागात विकासकामं हाती घेतली आहेत. केवळ राजकीय विरोध न करता सेना - काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाहक भीती बाळगू नये. प्रभाग समिती निधीचा निर्णय प्रभाग समिती घेईल. - हसमुख गेहलोत ( गटनेते , भाजपा )