मीरारोड : नाताळचा सण व सुट्टीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरु केलेला संप आज तिस-या दिवशी देखील कायम असल्याने बससेवे अभावी नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवसेनेने सत्ताधारी भाजपा व प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले असुन दुसरी कडे प्रशासनाने मात्र कोणतीच पर्यायी व्यवस्था न करता निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.पालिकेत भाजपाची स्पष्ट बहुमताची सत्ता आहे. तर स्वत: आ. मेहता हेच श्रमीक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसे असताना पालिकेच्या परिवहन उपक्रांतील कंत्राटी कामगारांचा किमान वेतना नुसारचा फरक, गेल्या महिन्याचे कमी मिळालेले वेतन आदी मागण्यां वरुन कर्मचा-यांनी शुक्रवारी दुपार पासुन अचानक संप सुरु केला. परिवहनची तरतुदच संपल्याने ठेकेदारास वेतनाची कमी रक्कम अदा केली. जेणे करुन कर्मचारयांना देखील कमी वेतन मिळाले.कर्मचा-यांनी आ. मेहता यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या या संपा मुळे शहरातील हजारो नागरीक मात्र वेठीस धरले गेले आहेत. विशेषत: मुर्धाते उत्तन - चौक व थेट गोराई तर काशिमीरा, हाटकेश, कनकिया आदि भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रीक्षा शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने रीक्षावाल्यांनी देखील अव्वाच्या सव्वा भाडं आकारुन लूटमार चालवली आहे.त्यातही सुट्टीचे दिवस असल्याने लोकं सहकुटुंब बाहेर पडतात. शिवाय नाताळचा सण असुन उत्तन - चौक - डोंगरी आदी भागात मोठ्या संख्येने राहणारया ख्रिस्ती बांधवांना याचा जाच सहन करावा लागतोय. मंगळवार २६ रोजी काशिमीरा येथील संत जेरॉम चर्च ची यात्रा असल्याने तेथे मोठ्या संख्यने यात्रेकरु जातात. बस सेवा बंदचा फटका नागरीकांना बसतोय.महापौर डिंपल मेहता यांच्या दालनात आ. नरेंद्र मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या सोबत आयुक्त डॉ. नरेश गीते आदिंची बैठक झाली. त्यात मध्ये परिवहन उपक्र माची आर्थिक तरतुद गेल्याच महिन्यात संपली असल्याने आवश्यक तरतुदीचे पुर्नविनीयोजन करुन घेण्यासह मंगळवारी बँका सुरु होताच रक्कम देण्याची तयारी प्रशासनाने दाखवली. पण कर्मचा-यांच्या नेतृत्वाने मात्र आडमुठेपणा कायम ठेवल्याने संप तिसरया दिवशी देखील सुरुच आहे.पालिका प्रशासनाने देखील सत्ताधारयांच्या संपा बद्दल कमालीची गुळमुळीत भुमिका घेतली असुन नागरीकांच्या सोयीसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्थाच केली नाही. प्रशासनाने निव्वळ बघ्याची भुमिका घेतली आहे. संपा मुळे नागरीकांचे हाल होत असुन उत्तन, डोंगरी, पाली, चौक आदी भागात संतापाचे वातावरण असुन शिवसेने सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले आहेत. आ. मेहतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.विजयकुमार म्हसाळ (उपायुक्त मुख्यालय ) - आ. मेहतांना मंगळवारी बँका उघडताच आर्थिक तरतुद करुन पैसे अदा करतो संप मागे घ्यावा असे सांगीतले आहे.आॅलवीस फॅरो ( प्रवाशी संघटना अध्यक्ष ) - नाताळचा सण आहे. या आधी दिवाळीत असाच कर्मचा-यांनी अचानक संप केला होता. सत्ताधारी यांनीच असे अचानक संप करुन सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणे निषेधार्ह्यच आहे.अरुण कदम ( माजी उपनगारध्यक्ष ) - सत्ता हातात असताना स्वत:च्या संघटनेतील कर्मचारयांचे प्रश्न सोडवायचे नाहीत व त्यांचा स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करुन घेत आहेत. भाजपा व त्यांच्या नेत्याने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे म्हणजे मनमानीपणाचा कळस आहे. पालिकेने कर्मचा-यांना न्याय द्यावा पण कर्मचारयांनी देखील नेत्यासारखा आडमुठेपणा करता बस सुरु कराव्यात अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल.
मीरा भार्इंदर परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांचा संप तीस-या दिवशी देखील सुरुच ; प्रशासनाची बघ्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 7:08 PM