एनआरसीसह नागरिकत्व कायद्याच्या प्रती जाळल्या; राष्ट्रवादीने केला मोदी सरकारचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 02:01 AM2019-12-12T02:01:05+5:302019-12-12T06:31:40+5:30
मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरु स्ती विधेयक मंजूर करून घेतले आहे.
ठाणे : सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण तापलेले असतानाच महाराष्ट्रातील पहिले आंदोलन ठाणे शहरात झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून या कायद्याच्या प्रती जाळल्या. तसेच, मोदी-शहा हे हिटलरच्या वाटेवर असल्याचा आरोप करून हिटलरच्याही प्रतिमेचे दहन केले.
या विधेयकाबाबत भाजपकडून सांगण्यात आले की,‘पाकिस्तानात हिंदूंची संख्या घटत गेली आहे’ त्यांच्या या वाक्याचा अर्थ काय समजायचा? ही मुस्लीम धर्मियांना धमकी आहे की खुणावताय? या देशाने बुद्ध आणि गांधी यांची अहिंसा आणि शांतता स्वीकारली आहे. द्वेष आणि हिंसा ही मुल्ये भारताने कधीच स्वीकारली नाहीत. त्यामुळेच भारत प्रगतीकडे वाटचाल करू शकला तर पाकिस्तान रसातळाला गेला. तुमची ही वाक्ये आता भारताला रसातळाला नेणारी आहेत. पण, भारत हा बुद्ध आणि गांधींचा आहे. तो कधीच गोळवलकरांचा होणार नाही, अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली.
मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरु स्ती विधेयक मंजूर करून घेतले आहे. या विधेयकामुळे धर्माच्या आधारे नागरिकत्व ठरवण्यात येणार आहे. त्याचा निषेध इशान्येकडील राज्यांमध्ये केला जात असतानाच उत्तर आणि दक्षिण भारतामधील पहिले आंदोलन ठाणे शहरात झाले. मोदी सरकार मुर्दाबाद, धर्मांध सरकार हाय-हाय, अशा घोषणा देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.