कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाचे २२७ रुग्ण आढळल्याने या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाचे रुग्ण कल्याण पश्चिम व डोंबिवली पूर्व भागात वाढत आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईला ये-जा करणाऱ्यांना तसेच इमारतींमधील रहिवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.
एकेकाळी कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या कल्याण-डोंबिवलीत डिसेंबरमध्ये रुग्णांची संख्या शंभरच्या आत होती. जानेवारीच्या पंधरवड्यात मृतांचे प्रमाण शून्यावर आले होते. मात्र, आता पुन्हा रुग्ण वाढू लागले असून, गुरुवारी ही संख्या दुपटीने वाढली. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रुग्ण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारच्या २२७ रुग्णांपैकी ९६ रुग्ण कल्याण पश्चिम, तर ५३ रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आहेत. डोंबिवलीतील रामनगर आणि पांडुरंगवाडीत तर, कल्याण पश्चिमेतील आधारवाडी, रामबाग, बेतूरकरपाडा, खडकपाडा तसेच टिटवाळा-मांडा येथे रुग्ण वाढत आहेत.
लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकलसेवा १ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश नागरिक हे मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त ये-जा करतात. लोकल तसेच बाजारांमधील वाढत्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा पसरू लागला आहे. त्याचबरोबर इमारतींमध्ये जास्त रुग्ण आढळत आहेत. अद्याप दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीतून रुग्ण वाढताना दिसत नाहीत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. सहव्याधी असलेल्या वृद्धांना घरी विलगीकरण करण्याचा सल्ला देऊ नये, असे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आदेश काढले आहेत.
‘उपचारासाठी पुरेशी सुविधा’
कोरोनाचे टेस्टिंग वाढविले जाणार आहे. सध्या टाटा आमंत्रा, डोंबिवली क्रीडा संकुल, डोंबिवली जिमखाना, कल्याण आर्ट गॅलरीसह कोरोना रुग्ण उपचार सेवा सुरू आहे. आरोग्य सेवासुविधा तयार असल्याने कोरोना रुग्ण वाढले तरी त्यांच्या उपचारासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, याकडे डॉ. पानपाटील यांनी लक्ष वेधले आहे.
------------------