ठाण्यातील झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात; नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:42 PM2020-12-26T23:42:39+5:302020-12-26T23:43:26+5:30
प्रशासनाला मिळाला मोठा दिलासा, जनजागृती ठरली फायदेशीर
- अजित मांडके
ठाणे : शहरातील बहुसंख्य झोपडपट्टी भाग हे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. येथील ८० टक्के नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आवाहनाला झोपडपट्टीतील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळेच सुनियोजित वसाहतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात यश आले आहे. मुंब्रा, वागळे, लोकमान्यनगरसह सहा नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
शहरात १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. मुंब्य्रासह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता. आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ही जबाबदारी नागरी आरोग्य केंद्रांवर सोपविली. या केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जनजागृती सुरू केली. प्रत्येक घरामध्ये व घरातील प्रत्येक सदस्यापर्यंत जनजागृती केली.
नियमांचे पालन केले, तर कोरोना नियंत्रणात ठेवता येईल, हे प्रत्येक नागरिकाच्या मनावर बिंबविले. आवाहन करून जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली. यामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. तसेच प्रत्येक झोपडीच्या ठिकाणी जाऊन सर्व्हे के. काही ठिकाणी फीव्हर क्लिनिकही सुरू केली, जी आजही सुरू आहेत. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या झोपडपट्टीमधील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली.
झोपडपट्टी परिसरात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. शुक्रवारी वागळे समितीमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर मुंब्रा आणि दिवा परिसरात १२ रुग्ण आढळले. मुंब्रा परिसरात सर्वात कमी २४ रुग्ण आहेत. दिवा व वागळे परिसरात अनुक्रमे ३३ व ५१ रुग्ण शिल्लक आहेत. सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या लोकमान्यनगरातही हा आकडा ८७वर आला आहे.