ठाणे : ख्रिस्ती बांधवांचा नाताळ हा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असून नेहमीप्रमाणे हा सण साजरा न करता कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे समाजबांधवांनी सांगितले. या वेळेस नातेवाइकांच्या भेटी रद्द केला आहेत, तर चर्चमध्ये जाऊन प्रार्थना म्हणण्याऐवजी ऑनलाइन प्रार्थना केली जाणार असल्याचे ख्रिस्ती कुटुंबीयांनी सांगितले. तसेच, दरवर्षी घरोघरी जाऊन करण्यात येणारे कॅरल सिंगिंगही रद्द केले आहे.नाताळ सणाच्या १५ दिवस अगोदरच घरोघरी सजावट, फराळ बनविण्याच्या तयारीला सुरुवात होते. यानिमित्ताने ख्रिस्ती बांधव घरांवर आकर्षक रोषणाई करतात. प्रभू येशूंची प्रार्थना गीते, नातेवाइकांना आमंत्रणाची धावपळ सुरू असते. चर्चमध्येही रंगरंगोटी आणि रोषणाई केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची धावपळ सुरू असते. यंदा मात्र कोरोनाने नाताळच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. कोरोनामुळे हा सण साजरा करण्यावर बंधने आल्याचे ठाण्यातील ख्रिस्ती कुटुंबीयांनी सांगितले. २४ तारखेच्या रात्री चर्चमध्ये जाऊन एकत्रितपणे प्रार्थना म्हटली जाते, परंतु यंदा घरातूनच ऑनलाइन प्रार्थना म्हणण्याचे आवाहन फादरने केले आहे, असे या कुटुंबीयांनी सांगितले. घरोघरी सजावट पूर्ण झाली असून ख्रिस्ती कुटुंबीयांनी आपापल्या घरात ख्रिसमस ट्री तर काहींनी त्यासोबत येशूच्या जन्माचा प्रसंग साकारला आहे. प्रत्येक कुटुंबात येशू जन्माची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच, सुरक्षितता म्हणून बाहेरून फराळ न आणता घरात ठरावीक गोड पदार्थ बनविले जात आहेत.
यंदा आम्ही कोरोनामुळे चर्चमध्ये न जाता घरातूनच ऑनलाइन प्रार्थनेला उपस्थित राहणार, तसेच नातेवाइकांच्या भेटीगाठी न घेता फोनवरून शुभेच्छा देणार आहोत. तसेच कॅरल सिंगिगही आम्ही रद्द केले आहे. कोरोनामुळे विविध पदार्थ न बनविता केवळ केक बनविणार आहोत, कारण आपली सुरक्षा ही आपल्याच हाती आहे.- कॅरलाईन फर्नांडिस
कोरोनामुळे नाताळ सणाचा उत्साह नसेल. यंदा घरात केक, कळकळ, करंजी, शंकरपाळी, चकली, पेरा इत्यादी पदार्थच बनविले आहेत. मुलांना नवीन कपडे घेतले आहेत.या जगातून कोरोनाचा नायनाट व्हावा, अशी प्रार्थना नाताळ सणानिमित्त प्रभू येशूकडे करणार आहे.- मार्गारेट बुथेलो