ठाणे: ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी 992 नवे रुग्ण आढळले असून 42 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ठाणे जिल्हयात बाधितांची संख्या 21 हजार 558 तर मृतांची संख्या 726 इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.रविवारी कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई महापालिकांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या पार गेली. बाधितांच्या या वाढत्या संख्येसह मृतांच्या वाढत्या संख्येमुळेही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 21 जून रोजी सर्वाधिक 254 रुग्णांच्या नोंदीसह दोघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या तीन हजार 512 तर मृतांची संख्या 73 झाली. त्यापाठोपाठ भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रतही दिवसेंदिवस ही संख्या वाढली आहे. याठिकाणी 170 नव्या रुगांची तर पाच जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एक हजार 45 तर मृतांची आकडा 71 वर पोहचला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात रविवारी 164 नवे रुग्ण दाखल झाले. त्यामुळे येथील बाधितांची संख्या सहा हजार 296 इतकी झाली. तर 10 जणांच्या मृत्युमुळे मृतांची संख्या 208 वर गेली आहे. नवी मुंबईत 154 नविन रुग्णांची भर पडली. तर सात जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 841 तर मृतांची संख्या 164 झाली आहे. त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये 106 रुग्णांना दिवसभरात लागण झाली. त्यामुळे याठिकाणी दोन हजार 258 इतकी बाधितांची संख्या झाली आहे.
सहा जणांच्या मृत्युने ही संख्याही 109 वर गेली आहे. उल्हासनगरमध्ये 51 रुग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे एक हजार 56 तर मृतांची संख्या 32 झाली. अंबरनाथमध्ये 19 नविन रुग्णांची भर पडली असून पाच जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 139 तर मृतांची संख्या 29 वर गेली आहे. बदलापूरातही नविन 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याने बाधितांची संख्या 552 तर दोघांच्या मृत्युमुळे मृतांची संख्या 13 झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात 49 रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या 859 तर मृतांची संख्या 27 वर गेली आहे.
दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार रविारी 29 मृत्यू झाल्याची नोंद होती. तर पालिकेच्या नोंदीनुसार ही संख्या दहा होती. त्यामुळे याठिकाणी नेमकी मृत्युची संख्या किती याबाबत प्रशासनाकडून नेमके उत्तर मिळू शकले नाही.