Coronavirus: विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी २९ समुपदेशकांची निवड; विनाशुल्क करणार समस्येचे निराकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 01:28 AM2020-05-03T01:28:25+5:302020-05-03T01:28:41+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हानिहाय नेमणूक
ठाणे/डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत. या सर्वांना करिअर तसेच विविध समस्यांबाबत समुपदेशन करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हानिहाय मार्गदर्शक आणि समुपदेशक नेमले असून ते विनाशुल्क सेवा देणार आहेत. ठाणे जिल्ह्यासाठी एकूण २९ समुपदेशक आहेत.
कोरोनामुळे दीड महिन्यापासून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा जूनमध्ये तरी शाळा सुरू होतील का? अभ्यासक्रम कसा पुरा केला जाईल, असे प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडलेले दिसतात. तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी या सुट्यांदरम्यान आपले पुढील वर्षाचे, करिअरच्यादृष्टीने नियोजन करत असतात. मात्र, या कोरोनामुळे त्यांना महाविद्यालये, विद्यापीठात चौकशीसाठी जाणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जिल्हानिहाय समुपदेशकांची यादी तयार केली आहे.
ठाण्यातील राजा शिवाजी विद्यामंदिरचे जयंत घाडगे, ‘सरस्वती सेकंडरी’चे सुरेश जंगले, ‘श्रीराम माध्यमिक’ येथील संगीता जाधव, एआय उर्दू हायस्कूलचे मोमीन जियाउद्दीन, अंजुमान खैरूल इस्लाम उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या फरझाना खान, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंगच्या डॉ. प्रभा खारटमोल, बी.एस.पाटील विद्यामंदिरचे विकास जाधव यांना समुपदेशक म्हणून नेमले आहे. तर उर्वरित जिल्ह्यात उल्हास विद्यालयचे युवराज भोसले, पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे बाळासाहेब ह्यालीज, रायते विभाग हायस्कूलचे कल्पेश शिंदे, टिळकनगर विद्यामंदिरच्या प्रज्ञा बापट, नॅशलन हायस्कूलचे सुरेश दाते, नवजीवन विद्यामंदिरचे कृष्णकांत सावंत, पी.ई.एस.न्यू इंग्लिश स्कूलच्या भाग्यश्री गिरी, भार्इंदरच्या अभिनव विद्यामंदिरचे एकनाथ बोरसे, आदर्श विनोदिनी मंडळ हायस्कूलचे तुषार देवरे, पाटील बालमंदिर अॅण्ड कॉलेजचे भास्कर निचिते, मार्लेश्वर विद्यालय, म्हारळचे संजय फिरके, प्रगती विद्यालय शहापूरचे सुनिल पाटील, एस.एन.लाहोटी विद्यालय, अनगावचे गोकुळ महाजन, मो.नारवा हायस्कूल, टिळकनगरचे संजय जाधव, भगत विद्यालयाचे सुकदेव महाजन, पी.आर. हायस्कूलचे चौधरी, एस.ए.मेमोरिअल उर्दू हायस्कूलचे अब्दुल अन्सारी, समदिया हायस्कूलच्या फरयाज मोमीन तर श्री सद्गुरू रिद्धिनाथबाबा हायस्कूलचे सदानंद जाधव, पिसाड विद्यालयचे अविनाश नेमाडे व मासवण विभाग हायस्कूल पालघरचे रवींद्र पाटील हे काम पाहतील.
1) समुपदेशकांनी आयव्हीजीएस संस्थेच्या माध्यमातून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे समुपदेशक शाळांमधून वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आयव्हीजीएसने दहावीच्या विद्यार्थ्याची कलचाचणी घेण्याचे काम पहिल्या दोन वर्षांत केले होते. कलचाचणीचे काम श्यामची आई फाउंडेशनला देण्यात आले. आता या संस्थेतील समुपदेशकांक डे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
2) विद्यार्थ्यांना हेल्पलाइन नंबर संपर्क साधून शंकाचे निरसन करता येणार आहे. दहावीचे विद्यार्थी देतात त्यापेक्षा ही कलचाचणी अधिक परिणामकारक असणार आहे. या कलचाचणीसाठी विद्यार्थ्यांना वेळ ठरवून दिला जातो. प्रश्न नीट वाचून उत्तरे द्यायची असतात. विविध प्रकारच्या आठ चाचण्या, बुद्धिमापन आणि व्यक्तिमापन केले जाते. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती पाहिली जाते. विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना समुपदेशन केले जाते.
3) विद्यार्थ्यांशी अर्धा तास संवाद साधला जातो. त्यांचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे. इतर अॅक्टिव्हिटीमध्ये त्यांनी कोणत्या विषयात प्रावीण्य मिळविले, हे पाहिले जाते. कलचाचणी ही वैयक्तिक पातळीवर होण्याची गरज आहे. दहावीची कलचाचणी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे न दिल्यास निकाल वेगळा येऊ शकतो, अशी माहिती समुपदेशक भास्कर निचते व तुषार देवरे यांनी दिली.