Coronavirus : आदिवासी आश्रमशाळांमधील ८५ हजार विद्यार्थ्यांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:39 AM2020-03-20T02:39:11+5:302020-03-20T02:39:38+5:30
जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आदिवासी विकास विभाग येथील अप्पर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणातील महाविद्यालये, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वसतिगृह (होस्टेल), आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या नामांकित आणि एकलव्य आदी २३७ शाळा, तसेच वसतिगृहांमधील ८५ हजार ८३४ विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहेत. परीक्षा सुरू असल्यामुळे केवळ दहावी, बारावीचे सात हजार १८० विद्यार्थी आश्रमशाळा, वसतिगृहांत वास्तव्याला आहेत.
जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आदिवासी विकास विभागाच्या येथील अप्पर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात शहापूर, पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, रायगड जिल्ह्यातील पेण, पुणे जिल्ह्यातील घोडेगाव आणि सोलापूर आदी सहा प्रकल्प कार्यालये आहेत. यामध्ये २३७ आश्रमशाळा, वसतिगृह, अनुदानित आश्रमशाळा आहेत. त्यापैकी आश्रमशाळा व वसतिगृहातील दहावी- बारावीचे सात हजार १८० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. उर्वरित ८५ हजार ८३४ विद्यार्थ्यांची घरवापसी करण्यात आलेली आहे.
शहापूर प्रकल्पाच्या नियंत्रणातील २३ आश्रमशाळांमध्ये केवळ ८०२ दहावीचे विद्यार्थी आहेत. उर्वरित ८,८१७ विद्यार्थ्यांना घरी पाठवून देण्यात आले आहे. दहा वसतिगृहामधील ७१४ विद्यार्थ्यांचीही घरी रवानगी करण्यात आली आहे. १३ अनुदानित आश्रमशाळांमध्ये ४७८ विद्यार्थी आहेत. उर्वरित चार हजार ७०९ विद्यार्थी घरी गेले आहेत. शेंडे येथील एकलव्य शाळेतील २०५ विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. याशिवाय जव्हारच्या ३० आश्रमशाळांच्या १७ हजार ७४५ पैकी केवळ एक हजार ९७० विद्यार्थी शाळेत आहेत. अनुदानित आश्रमशाळेतील ११ हजार ७६० पैकी केवळ ७६५ विद्यार्थी वास्तव्याला आहेत. १६ वसतिगृहातील एक हजार ४३६ विद्यार्थ्यांपैकी केवळ १६ विद्यार्थी वसतिगृहात असून, उर्वरित घरी पाठवण्यात आलेले आहेत.
रायगडच्या पेण प्रकल्पामधील १४ आश्रमशाळांच्या पाच हजार ३१३ पैकी ३५९ विद्यार्थी शाळेत आहेत. १२ वसतिगृहांमधील एक हजार २३७ पैकी ३७ विद्यार्थी वसतिगृहांत आहेत. नामांकित शाळा पाच असून, त्यातील दोन हजार १२८ पैकी ९४ विद्यार्थी शाळेत आहेत. या प्रकल्पातील दहा अनुदानित शाळांमध्ये चार हजार ४८६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३९७ विद्यार्थी आहेत. घोडगावच्या नऊ आश्रमशाळांच्या दोन हजार ९३१ पैकी केवळ ३०८ विद्यार्थी आहेत. २४ वसतिगृह, २३ आश्रमशाळा, १८ नामांकित शाळांचे विद्यार्थी घरी गेले आहेत.