CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात ८५७ रुग्णांची नोंद; ३२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 02:50 AM2020-06-20T02:50:30+5:302020-06-20T02:50:38+5:30
एकूण बाधितांची संख्या १९ हजार ५२० तर, मृतांची संख्या ६५७
ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ८५७ रुग्णांची तर ३२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण बाधितांची संख्या १९ हजार ५२० तर, मृतांची संख्या ६५७ झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २३६ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या ३ हजार १५ तर, मृतांची संख्या ६९ इतकी झाली आहे. त्या पाठोपाठ ठाणे पालिका क्षेत्रात १८७ बाधितांची तर, दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ५ हजार ९५६ तर, मृतांची संख्या १९२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत १२४ रुग्णांची तर, नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ४ हजार ५१५ तर, मृतांची संख्या १४७ वर पोहचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ६७ बाधितांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ७९४ तर, मृतांची संख्या ६४ वर पोहचली. मीरा भार्इंदरमध्ये ६६ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या २ हजार १६ तर, मृतांची संख्या ९९ इतकी झाली आहे. उल्हासनगरमध्ये ४६ रुग्णांची तर, एकाचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या ९५० तर, मृतांची संख्या २९ झाली आहे. अंबरनाथमध्ये ७४ रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ९८९ तर, मृतांची संख्या २३ झाली आहे. बदलापूरमध्ये २७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या ५०१ झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात ३० रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांची संख्या ७८४ वर गेली आहे.
वसई-विरारमध्ये ९३ नवीन रुग्ण, दोघांचा मृत्यू
वसई-विरार शहरात शुक्रवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात ९३रुग्ण आढळले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,९३८ वर पोहचली आहे. तर २० रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,०९४ झाली आहे. तर आजवर ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ७७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.