ठाणे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे बळी जाणे, हे दुर्दैवी आहेच. पण ताप, घसादुखी, थकवा अशी लक्षणे जाणवू लागल्याने डॉक्टरांकडे गेलेल्या लोकांचे स्वॅब घेतल्यावर रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागतात. या काळात अनेकांना ना सरकारी, ना खासगी रुग्णालयात उपचार मिळतात. नेमका याच काळात रुग्णांच्या शरीराचा ताबा कोरोनाच्या विषाणूंनी घेतल्यानंतर रुग्णवाहिका मिळून इस्पितळात बेड उपलब्ध होईपर्यंत काहींचा जीव जात आहे. काहींना तर रिपोर्ट येईपर्यंतही संधी मिळत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांचे पॉझिटिव्ह अहवाल येतात. कोरोनाचा मुकाबला करण्यात आपली आरोग्य यंत्रणा किती तोकडी पडली आहे, त्याचे ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील चित्र डोळ्यांत अंजन घालणारे आहे. कोरोनापेक्षा त्याचे भय कितीतरी पटीने वाढण्यास ही दुबळी, नफेखोर आरोग्यव्यवस्था कारणीभूत आहे. कोरोना संशयितांवर उपचार न करण्याचे हे धोरण लागलीच बदलले नाही तर या मृत्यूला केवळ सरकार जबाबदार असेल, असे मृत संशयित कोरोना रुग्णांच्या नातलगांचे म्हणणे आहे.
CoronaVirus News: संशयितांची जीवघेणी प्रतीक्षा; सावळ्या गोंधळाचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 1:48 AM