Coronavirus: कोरोनामुळे केडीएमसीला बसला फटका; उत्पन्न ९०० कोटींनी घटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:50 PM2020-08-28T23:50:03+5:302020-08-28T23:50:21+5:30
३ सप्टेंबरला होणार ऑनलाइन महासभा
कल्याण : केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनातर्फे अर्थसंकल्प सादर करताना एक हजार ९९७ कोटी रुपये उत्पन्न तर, खर्चाची एक हजार ९९६ कोटी रुपये बाजू दर्शवली होती. मात्र, कोरोनाचा फटका मनपाच्या अपेक्षित उत्पन्नास बसणार असल्याने ५० टक्केच गंगाजळी तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास ९०० कोटींचा फटका मनपास बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीने चर्चा करून त्यात फेरबदल केले होते. स्थायीचे सभापती महासभेला अर्थसंकल्प सादर करणार होते. मात्र, कोरोनामुळे पाच महिने महासभा झालेली नाही. त्यामुळे महासभेपुढे अर्थसंकल्प स्थायीकडून सादर होऊन तो मंजूर झालेला नाही. ३ सप्टेंबरला आॅनलाइन महासभा होणार असून, त्यात स्थायीचे सभापती अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
कोविडमुळे नव्या बांधकामांना परवानगी देण्याचे काम संथगतीने सुरू आहे. मजुरांअभावी तसेच आर्थिक फटका बसल्याने गृहप्रकल्प रखडले आहेत. बिल्डरांनीही नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव मनपाकडे मंजुरीसाठी पाठवलेले नाहीत. परिणामी, विकास शुल्कापोटी मिळणारी रक्कम मनपाला मिळालेली नाही. दुसरीकडे महापालिकेस सरकारकडून मिळणाऱ्या निधीत कपात करण्यात आली आहे. मनपा हद्दीत घर खरेदीविक्री होत नसल्याने मनपाला मुद्रांक शुल्कापोटी मिळणारा निधी मिळालेला नाही.
दुसरीकडे राज्य सरकारने मनपा हद्दीतून १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या गावांतून मालमत्ता व पाणीपट्टी बिलापोटीचा मिळणारा महसूलही ठप्प झाला आहे. मनपाचे प्रथम प्राधान्य हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावर आहे. त्यामुळे करवसुलीवर परिणाम झाला आहे.
विकासकामांवरही होणार परिणाम
केडीएमसीकडून यंदाच्या आर्थिक वर्षात एक हजार ९९६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार होती. मात्र, उत्पन्नात ५० टक्के घट होणार असल्याने काही कामे करणे मनपास शक्य होणार नाही. महापालिकेत २०१६ पासून उत्पन्न आणि खर्चाच्या दरम्यान ३०० कोटींची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलारासू यांनी ३०० कोटींच्या विकासकामांना कात्री लावली होती. तेव्हापासून कामे होत नसल्याची ओरड नगरसेवकांकडून होत आहे. यंदाही अपेक्षित उत्पन्न व खर्चात भली मोठी तूट होणार असल्याने पुन्हा यांच्याकडून ओरड होण्याची शक्यता आहे.