ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असून ते ५५०० च्या घरात आले असून नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही घटले आहे. तर, रुग्णदुपटीचा कालावधी ८५ दिवसांवरून १३५ दिवसांवर गेला असून बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर आले आहे. याशिवाय, मृत्युदरही आता २.५० टक्क्यांवर आला आहे.
मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टशिवाय सप्टेंबर महिन्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसली. सप्टेंबर महिन्यात १० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले, तरी आठ हजारांहून अधिक बरेदेखील झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कोरोनास अटकाव करण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवून ऑगस्ट अखेरपर्यंत रोज सरासरी २३०० चाचण्या केल्या जात होत्या आणि त्यामध्ये दोनशेच्या आसपास रुग्ण आढळत होते. सप्टेंबर महिन्यापासून चाचण्यांची संख्या दुप्पट केली आहे. त्यामुळे दिवसाला ५५०० हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ४०० च्या आसपास रुग्ण आढळते होते. परंतु, आता ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसांनंतर शहरात कोरोनाबाधितांची संख्या घटत असून २५० च्या खाली आहे.
सप्टेंबर महिन्यात हेच प्रमाण ३०० वर होते. तर, सप्टेंबर महिना अखेरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के होते. ते आता ९१ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
आतापर्यंत १,१२० जणांचा मृत्यूमागील सहा महिन्यांचा विचार केल्यास एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९.७३ टक्के होते. ते ऑक्टोबरअखेरपर्यंत ९१ टक्क्यांवर आले आहे. तर, रुग्ण आढळण्याचे जे प्रमाण ६.४० टक्के होते, ते ऑगस्ट महिन्यात १५.६३ टक्के होते. ते आता ९.४१ टक्क्यांवर आले आहे. - रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91% वर आले आहे.- महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४४ हजार ७८९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४० हजार ८६० रुग्ण बरे झाले आहेत, तर ११२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.