coronavirus: आर्थिक डोलारा कोसळला, ठाणे महापालिकेला कोरोनामुळे फटका; तीन महिन्यांमध्ये शून्य उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 02:19 AM2020-07-08T02:19:49+5:302020-07-08T02:20:17+5:30
आधी जकात त्यानंतर एलबीटी बंद झाल्याने महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे.
- अजित मांडके
ठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल, मे आणि जूनच्या अखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ३२५ कोटींच्या वर उत्पन्न मिळाले होते. परंतु, यंदा पहिल्या तिमाहीत कोणत्याही प्रकारची बिले न पाठवल्याने किंवा इतर उत्पन्नाच्या स्रोतांमधूनही शून्य उत्पन्न आल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. येत्या काही महिन्यांत या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर कर्मचाऱ्यांचा पगार निघेल का नाही, अशी चिंता प्रशासनाला सतावत आहे. दुसरीकडे ठेकेदारांची मार्चअखेरपर्यंतची तब्बल १०० कोटींची देणी द्यावी लागणार असून ती कशी द्यायची, याचाही पेच उभा ठाकला आहे.
आधी जकात त्यानंतर एलबीटी बंद झाल्याने महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. आधीच गेल्या काही वर्षांत घेतलेल्या अधिक खर्चीक प्रकल्पांमुळे महापालिकेवर सुमारे ३२०० कोटींचे दायित्व आहे. त्यात आता कोरोनामुळे ठेकेदारांची बिलेदेखील विलंबाने निघत आहेत. तर कोरोनासाठी तात्पुरते उभारलेल्या कोविड सेंटरमधील डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आदींसह इतर पदे भरून त्यांना दुप्पट वेतन देण्याचे पालिकेने कबूल केले आहे.
महापालिकेचे गेल्या वर्षीचे उत्पन्न हे २३९७.६२ कोटी होते. त्याच्या आधारावर येत्या काही महिन्यांचा गाडा हाकावा लागणार असून कर्मचाऱ्यांचा पगार, कोरोनावर केलेला विविध उपाययोजनांवरील खर्च, ठेकेदारांची किमान अत्यावश्यक कामांची बिले द्यावीच लागणार आहेत.
शिवाय ३२०० कोटींच्या दायित्वापैकी थोडी रक्कम तरी द्यावी लागणार आहे. त्यात आता शहरात विविध स्वरूपाची कामे करून घेतल्यानंतर आता ठेकेदारांनी बिले निघावीत म्हणून महापालिकेत खेटा घालण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारी एका ठेकेदाराने महापालिका मुख्यालयातच उपोषणाचे हत्यार उपसले होते. केवळ एकाच ठेकेदाराचे बिल थकीत नसून महापालिकेकडे विविध ठेकेदांची १०० कोटींची बिले थकीत असल्याचे समोर आले आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात २८.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तर मे महिन्यात मालमत्ता कराची बिले लावली गेल्याने मे ते जून अखेरपर्यंत २९० कोटींच्या आसपास उत्पन्न प्राप्त झाले होते. यंदा मात्र याच महिन्यात शून्य उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामुळे पालिका आता मालमत्ता कराची आणि पाणी बिलाची बिले तयार करीत असून ती आता ठाणेकर करदात्यांना दिली जाणार आहेत.
परंतु, महापालिकेची उपलब्ध असलेली सर्वच यंत्रणा ही कोरोनासाठी काम करीत आहे. त्यामुळे ती कोण देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याची परिस्थिती पाहता ठाणेकर वेळेत बिल भरतील का, हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.
शहरातील विकासकामे ठप्प
शहर विकास विभागाकडून मागील वर्षी
663
कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
परंतु, आता कोरोनामुळे शहरातील गृहप्रकल्पांवरदेखील परिणाम झाला असून नव्याने प्रकल्प येतील का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रमुख उत्पन्नावरदेखील पाणी सोडावे लागणार आहे.