Coronavirus: कोरोनाच्या भयाने मोटार खरेदी वाढली; सार्वजनिक वाहतूक टाळण्याकडे कल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 01:40 AM2020-10-13T01:40:18+5:302020-10-13T01:40:30+5:30
दुचाकी, ट्रॅक्टरचीही मागणी वधारली, कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन केला होता.
जितेंद्र कालेकर
ठाणे : कोरोनाच्या प्रकोपामुळे गेली अनेक दिवस थंडावलेला दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा तसेच ग्रामीण भागातील ट्रॅक्टरचा व्यवसाय आता पुन्हा नव्याने उभारी घेऊ लागला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास केल्यास कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीमुळे संपूर्ण ठाणे जिल्हयात मोटारकारच्या खरेदीमध्ये तर चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये ८५९ कारची खरेदी झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये एक हजार १६२ इतक्या मोटारींची विक्री झाली आहे. मोटारसायकल आणि ट्रॅक्टर खरेदीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ झालेली नसली तरी गेल्या सहा महिन्यांतील ग्राहकांचा निरुत्साह पाहता सप्टेंबर महिन्यात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे दुचाकी, चार चाकी त्याचबरोबर ग्रामीण भागात ट्रॅक्टर खरेदीसाठी ग्राहकांनी सुरुवात केली आहे. एरव्ही, आवडीच्या रंगासाठी किंवा आवडीच्याच ब्रॅन्डसाठी थांबणारे ग्राहक आता शोरुममध्ये उपलब्ध असलेल्या वाहनांना पसंती देत आहेत. ठाणे जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ मध्ये सहा हजार १३५ ग्राहकांनी दुचाकींची खरेदी केली होती. यंदा सप्टेंबर २०२० मध्ये हा आकडा कमी होऊन तो चार हजार ८२० झाला आहे. मात्र त्यापूर्वीच्या महिन्यांमधील दुचाकीच्या खरेदीतील घसरण पाहता हा चांगला प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर खरेदीतही ग्राहकांनी उत्साह दाखविला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये २५ ट्रॅक्टरची खरेदी झाली. सप्टेबर २०२० मध्ये हा आकडा १६ वर गेला.
प्रत्येक वाहन खरेदीसाठी वेगळ््या ब्रॅन्डची मागणी असते. एका ठराविक दुचाकीसाठी एकेकाळी चार महिन्यांचे वेटींग होते. आता कलर आणि तशाच प्रकारच्या दुचाकी उपलब्ध होत असल्यामुळे वेटींगचे प्रमाण फारसे नाही. मागणीच्या तुलनेत उत्पादन कसे आहे. त्यावर हा वेटींगचा काळ अवलंबून आहे. - जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
दुचाकीची मागणी चांगली आहे. कोरोनामुळे अपेक्षित दुचाकींची पूर्तता होत नाही. १०० दुचाकींची मागणी केल्यानंतर ५० वाहने उपलब्ध होत आहेत. - राजशंकर नायर, व्यवस्थापक, रणजीत मोटर्स, ठाणे
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्राहकांना हवे असलेले ट्रॅक्टर उपलब्ध होत नाही. ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळे विक्रीमध्येही वाढ झाली आहे. - विजय जोशी, ट्रॅक्टर विक्रेते, मुंबई
चार चाकी वाहनांची व मुख्यत्वे मोटारींची विक्री वाढलेली आहे. प्रत्येकाला कोरोनाच्या भीतीमुळे सार्वजनिक वाहनांमधून प्रवास टाळावा, असे वाटू लागले आहे. त्यामुळे छोटी का होईना मोटार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे - संभाजी चव्हाण, मोटार विक्रेते, ठाणे
गेल्या चार वर्षांत माझ्याकडे रक्कम जमा झाली होती. गेल्या पाच महिन्यांतील कोरोनाचा काळ पाहिल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवास टाळण्याकरिता स्वत:ची मोटार खरेदी करणे ही गरज वाटली. - प्रथमेश कदम, कळवा, ठाणे.