ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून यापूर्वी एखाद्या इमारतीमध्ये कोरोना रुग्ण आढळला, तर प्रवेशद्वारावर फलक लावला जात होता; परंतु आता ज्या घरात रुग्ण आढळला असेल त्या घरावरच स्टिकर लावण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका हद्दीत रुग्णवाढीचा दर हा अचानकपणे १५ टक्क्यांपर्यंत आला आहे. सध्या ५,०१८ प्रत्यक्ष उपचार घेणारे रुग्ण आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे घरी उपचार घेत आहेत. काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेने ज्या- ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, त्या- त्या भागात ताप सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे, तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीमही हाती घेतली आहे. याशिवाय काही रुग्णांच्या घरातील व्यक्ती इतरत्र फिरतात. वास्तविक त्यांनी १४ दिवस घरीच विलगीकरणात राहणे अपेक्षित आहे; परंतु तसे होताना दिसत नाही किंवा घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याची माहितीदेखील इतरांना मिळत नाही. त्यामुळे आता महापालिकेने ज्या घरात रुग्ण आढळला असेल त्या घरावरच स्टिकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. ते लावल्यावर रहिवाशांना संबंधित घरात कोरोना रुग्ण आहे, याची माहिती होऊन तेदेखील दक्षता घेतील, हा उद्देश आहे.
कॉलिंगचे प्रमाण वाढविलेठाणे महापालिकेने आता २५ जणांची टीम सज्ज ठेवली आहे. ही टीम एखादा कोरोनाबाधित घरी उपचार घेत असेल, तर त्याची रोजच्या रोज विचारपूस करणे, त्यांना कशाची गरज आहे का? याची माहिती घेत आहे. त्यानुसार मागील आठवडाभरात साडेचार हजार नागरिकांशी या टीमने संपर्क साधलेला आहे.