CoronaVirus News: 'ती' चूक तुम्ही करू नका, मोठी किंमत मोजावी लागेल; आव्हाडांचं जनतेला कळकळीचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:49 AM2020-05-11T11:49:48+5:302020-05-11T11:54:49+5:30
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपचार घेऊन घरी परतले
ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना काल मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. २३ एप्रिलपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुढील काही दिवस आव्हाड डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबतील. आव्हाड यांनीच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
मी सुरुवातीला कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र सुदैवानं मी यामधून वाचलो, असं आव्हाड म्हणाले. 'सुरुवातीला माझी चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे मी परिस्थिती गांभीर्यानं घेतली नाही,' असं आव्हाड यांनी सांगितलं. 'त्यानंतर मला ताप आला. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्यानं ही लक्षणंदेखील दूर होतील, असं मला वाटलं. ती माझी चूक होती. त्याची मोठी किंमत मला मोजावी लागली,' असं आव्हाड म्हणाले.
या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड मा.शरद पवार साहेब ,जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे मा.उद्धवजी ठाकरे ,मा.सुप्रियाताई सुळे ,मा.अनिल देशमुख ,मा.जयंत पाटील ,मा.राजेश टोपे ,मा.मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2020
लोकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं, लक्षणं दिसल्यास ती गांभीर्यानं घ्यावीत, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. 'कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यास नागरिकांनी प्रशासनाला सतर्क करावं. तातडीनं डॉक्टरांकडे जावं. तुम्ही लक्षणांकडे दुर्लक्ष केलं, उपचारांना उशीर केला, तर त्याची जबर किंमत तुम्हाला मोजावी लागेल,' असं आव्हाड पुढे म्हणाले.
माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2020
सुरुवातीला आव्हाड यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुंब्रा परिसरात अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम सुरू ठेवला. 'मला काहीही होणार नाही, असं मला वाटलं. मी लोकांमध्ये जाऊन जेवणाची पार्सल्स वाटत होतो. मी तसं करायला नको होतं,' असं आव्हाड म्हणाले. रुग्णालयातून घरी परतलेल्या आव्हाडांनी त्यांची काळजी घेणाऱ्या सर्वांचेच आभार मानले.
...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर
गिलगिट-बाल्टिस्तानवर भारताच्या 'मास्टरस्ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज