Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात आणखी दोन अधिकाऱ्यांसह १७ पोलिसांना कोरोनाची लागण
By जितेंद्र कालेकर | Published: June 21, 2020 11:52 PM2020-06-21T23:52:53+5:302020-06-21T23:55:24+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय आणि भिवंडीमध्ये पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणे अधिक वाढले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये निजामपूरा येथील एका निरीक्षकासह १७ पोलिसांना लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांवर विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या दोन दिवसांमध्ये निजामपूरा येथील एका निरीक्षकासह १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मुख्यालयातील चौघांचा समावेश आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय आणि भिवंडीतील पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
नागरिकांप्रमाणेच पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. यात मुख्यालयासह भिवंडीमध्ये हे प्रमाण लक्षणीय आहे. १९ जून रोजी उल्हासनगर, शिवाजीनगर आणि शहर वाहतूक शाखेतील प्रत्येकी एक अशा तीन पोलिसांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना वेगवेगळया रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले. त्यापाठोपाठ २० जून रोजी निजामपूरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तसेच डायघरचे पोलीस हवालदार, कापूरबावडीचे कॉन्स्टेबल, शहर वाहतूक शाखेचे नाईक आणि भोईवाडा पोलीस ठाण्याचे दोघे कर्मचारी त्याचबरोबर निजामपूरा आणि बाजारपेठचे दोन कर्मचारी अशा नऊ जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर २१ जून रोजी ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील एका महिलेसह चार पोलीस कर्मचारी आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याचेही एक हवालदार असे पाच जण एकाच दिवशी बाधित झाले. या पाचही जणांवर अंबरनाथ, सिडको, वाशी, भार्इंदरपाडा आणि नव्याने उभारण्यात आलेल्या ठाण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत ३३ अधिकारी आणि ३१४ कर्मचारी बाधित झाले असून दोघा कोरोनाबाधितांचा तर एका कोरोना संशयित पोलिसाचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत २६ अधिकारी आणि २३४ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. परंतू, तरीरी पोलिसांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त होत आहे.