Coronavirus News: समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येत कोरोनाच्या संकटावर मात करणे गरजेचे: विवेक फणसळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:39 PM2020-06-26T23:39:34+5:302020-06-26T23:43:59+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संस्थांच्या मदतीने आयुक्तालयातील तब्बल नऊ हजार पोलिसांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. व्हॅनमधील फिरत्या दवाखान्यामार्फत सर्वच ३५ पोलीस ठाण्यांमध्ये ही तपासणी होईल. अशा तºहेने सर्वच घटकांनी एकत्र येऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे गरजेचे असल्याचे मत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पोलिसांनी कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात स्वत:च्या सुरक्षेबरोबरच शिस्तही पाळली पाहिजे. त्याचबरोबरच नागरिकांसह सर्वच घटकांनी एकत्रित येऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शुक्रवारी पोलिसांसाठीच्या फिरत्या दवाखान्याच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केले.
एमसीएचआय, क्रेडई, देश अपनाये आणि भारतीय जैन संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे नऊ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी फिरत्या दवाखान्याद्वारे केली जाणार आहे. याच उपक्रमाचा शुभारंभ फणसळकर यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालयातून करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ठाण्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह रोखण्यासह लाखो श्रमिकांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी पोलिसांनी महत्वपूर्ण भूमीका बजावली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर आपले योगदान देतांना ४०० पेक्षा अधिक पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. यात ३१४ पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर सुमारे १०० जणांवर उपचार सुरु आहेत. बंदोबस्ताचा ताण काहीसा कमी झाला असला तरी पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होतच आहे. याच पाशर््वभूमीवर पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी भारतीय जैन संघटनेसह बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनीही मदतीसाठी उत्स्फूर्त सहकार्य केले. यामध्ये कोरोनाबाधित पोलिसांच्या कुटंूबियांचीही कोरोनाची मोफत तपासणी केली जाणार आहे. कालपर्यंत सुरक्षित आहे म्हणून कोणीही हलगर्जीपणा करु नये. जागृक रहा. जनतेलाही जागृक राहण्याचे आवाहन करा. जनतेचा सहयोग मिळवा. सर्वच घटकांनी एकत्रित येऊन या संकटावर मात करणे गरजेचे आहे, असा सल्लाही फणसळकर यांनी यावेळी दिला. यावेळी नमन गृपचे अध्यक्ष जयेश शहा, निर्मल लाईफ स्टाईलचे धर्मेश जैन, राजूल व्होरा, दीपक गोराडिया आणि नयनेश शहा यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, उपायुक्त दीपक देवराज आणि पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे आदी उपस्थित होते.
* आरोग्य तपासणी शिबिराची सुुरुवात शुक्र वारी ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयापासून झाली. एकाच दिवसात ३६७ पोलिसांची डॉक्टरांच्या एका पथकाने तपासणी केली. यात सौम्य लक्षणे असणाºया २५ जणांचे स्वॅबही घेण्यात आले. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर, वागळे इस्टेट, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण अशा पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांमधील नऊ हजार पोलिसांची १० जुलैपर्यंत या शिबिराद्वारे तपासणी केली जाणार आहे. एका वाहनातून हे पथक पोलीस ठाण्यांमध्ये येणार असल्यामुळे कामाच्या ठिकाणीच पोलिसांना ही सुविधा मिळणार आहे.
* पोलिसांच्या कोविड काळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पोलिसांची ही तपासणी करीत असल्याचे नयनेश शहा यावेळी म्हणाले.