लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि पोलिसांनीही अधिक जबाबदारीने राहिले पाहिजे, असा कळकळीचा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर, सावरकरनगर या भागात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या समवेत लोकमान्यनगर पाडा क्रमांक एक ते तीन, सावरकरनगर, वागळे इस्टेट, जयभवानीनगर, यशोधननगर, वर्तकनगर या भागात शनिवारी आणि रविवारी भेट देऊन आढावा घेतला. कंटेनमेंट झोन मधील रहिवाशांनी सोशल डिस्टसिंगचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले. काही पोलीस मित्रांशीही त्यांची याबाबत चर्चा केली. पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे आम्हीही त्यांना या कोरोनाच्या युद्धात उत्स्फुर्तपणे मदतीचा हात देत असल्याचे या पोलीस मित्रांनी आयुक्तांना सांगितले. फणसळकर यांनीही कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात पोलिसांना मदत करणाऱ्या या पोलीस मित्रांचे आभार मानले.* ज्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तिथे महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने सॅनिटायझेशन करणे, एखाद्याला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी मदत करणे अशा सूचनाही आयुक्तांनी पोलीस आणि पोलीस मित्रांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Coronavirus News: कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी- विवेक फणसळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:14 AM
ठाणे शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लोकमान्यनगर पाडा क्रमांक एक ते तीन, सावरकरनगर, वागळे इस्टेट आणि यशोधननगर आदी कंटेनमेंट भागात शनिवारी भेट देऊन आढावा घेतला. नागरिकांनी आणि पोलिसांनीही अधिक जबाबदारीने राहिले पाहिजे, असा कळकळीचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
ठळक मुद्देठाण्यातील लोकमान्यनगर, किसननगरमध्ये केली पाहणीपोलीस मित्रांकडून घेतला आढावा