CoronaVirus News: लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजी मार्केट, किराणा दुकानांमध्ये गर्दी; सोशल डिस्टेंसिंगची एैशी तैशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 06:07 PM2020-07-01T18:07:34+5:302020-07-01T18:18:29+5:30
पोलिसांकडून या भागात गाडी फिरून नागरीकांना विनंती केली जात होती.
ठाणे: ठाणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे अखेर 2 जुलै ते 12 जुलै या कालावधीत संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी ठाणो शहरातील मुख्य भाजी मार्केट, किरणा मार्केट तसेच शहरातील इतर भागात असलेल्या दुकानांमध्ये नागरीकांची एकच गर्दी उडाली होती. लॉकडाऊन एकच्या वेळेस ज्या पध्दतीने गर्दी बाजारात दिसत होती. तेवढी नसली तरी देखील नागरीकांकडून सोशल डिस्टेसींगच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आले.
पोलिसांकडून या भागात गाडी फिरून नागरीकांना विनंती केली जात होती. परंतु तरी देखील त्याकडे कानाडोळा होतांना दिसला. त्यात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असे पालिकेने काढलेल्या आदेशात म्हंटले असले तरी महापालिकेच्या वतीने भाजीवाल्यांना आणि दुकानदारांना बंदचे आवाहन करण्यात आल्याने मार्केटमध्ये गर्दी झाल्याचे दिसत होते.
ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजाराहून अधिक झाली आहे. तसेच मृतांची संख्या देखील 300 च्या घरात आली आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यासाठी दोन दिवसांच्या सावळ्या गोंधळा नंतर अखेर पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणो शहर लॉक डाऊन करण्यात आले आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी महापालिकेने भाजी मार्केट, किराणा दुकाने व इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले आहे. भाजी मार्केटमधूनच कोरोनाचा अधिक प्रसार झाल्याचाही दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु त्यामुळेच बुधवारी जांभळी नाक्यावरील प्रमुख मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी नागरीकांची झुंबड उडाल्याचे दिसत होते.
सकाळी सात वाजल्यापासूनच नागरीकांनी येथे गर्दी केल्याचे दिसत होते. पुढील 10 दिवस बंद राहणार असल्याने जास्तीची भाजी खरेदी केली जात होती. आधीच तीन महिने हाल सुरु होते. आता कुठे पुन्हा नव्याने सुरवात असतांना, पालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत नाही, तर संताप व्यक्त करण्यात येत होता. किराणा मालांची दुकाने देखील सम- विषम तारखेला सुरु असल्याने बुधवारी जी दुकाने सुरु होती, त्याठिकाणी नागरीकांनी गर्दी केल्याचे दिसत होते. त्यामुळे सोशल डिस्टेसींगचे पालनही होतांना दिसले नाही, पोलिसांकडून वारंवार सुचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान आधी जवळ जवळ दोन महिने लॉकडाऊन घेण्यात आला होता. परंतु अनलॉक जाहीर झाल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.
आता देखील 10 दिवस लॉकडाऊन घेतल्यानंतर पुन्हा अनलॉक सुरु झाले तर त्यावेळेस कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच आज ज्यांनी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली त्यांना लागण होऊ शकत नाही का?, मग याला जबाबदार कोण असा सवालही आता उपस्थित झाला आहे. महापालिकेने अत्यावश्यक सेवा बंद करणो गरजेचे नव्हते. त्या सुरु ठेवण्याची गरज होती. असे मत नागरीक व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे मासळीची दुकाने, चिकण, मटण विक्रीची दुकाने येथेही बुधवारी अचानक मोठय़ा रांगा लागल्याचे दिसून आले. बुधवारी एकादशी असली तरी देखील शुक्रवार आणि रविवारसाठी स्टॉक करुन ठेवण्यासाठी नागरीकांनी येथे गर्दी केल्याचे दिसत होते. तसेच शहरातील इतर भागातील किराणा दुकानांबाहेरही नागरीकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते.
पुन्हा 10 दिवस लॉकडाऊन होणार असल्याने मी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आली आहे. पुढील 10 ते 12 दिवस पुरेल एवढी भाजी घेऊन जात आहे. मुळात आधीच लॉकडाऊनमध्ये आमचे हाल झाले आहेत, त्यात आता दुसरा अनलॉक जाहीर झाल्यानंतर पुन्हा लॉकडाऊनची गरज होती का? असा आमचा सवाल आहे. (मनीषा जाधव - गृहीणी, ठाणेकर).
पुढील 10 लॉकडाऊन असल्याने मी देखील भाजी आणि किराणा खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आलो आहे. उलट आधी गर्दी होत नव्हती, मात्र आता पुन्हा लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने मार्केटमध्ये गर्दी झाली आहे. आता पुढील महिनाभर पुरेल एवढा किराणा भरुन ठेवणार आहे. तसेच 10 ते 12 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करण्यासाठी आलो आहे. (सुमीत गुप्ता - ग्राहक, ठाणेकर)